Monday 15 February 2010

हरिश्चंद्राची फॅक्टरी (२००९)

दिग्दर्शक - परेश मोकाशी.
ऑस्करसाठी या वर्षीचा भारतातर्फेची अधिकृत प्रवेशिका असलेला बहुचर्चीत मराठी चलचित्रपट ’हरिश्चंद्राची फॅक्टरी’ पाहण्याचा योग आला.
भारतिय चित्रपट सृष्टीचे जनक असणा‌र्‍या दादासाहेब फाळके यांच्या चित्रपट बनविण्याच्या प्रवास म्हणजे हा चित्रपट.

वर्ष १९११, इंग्रजांच्या राजवटीत केळफा (फाळके) इंग्लंडचा ख्रिस्तावरिल मुकपट पाहुन प्रभावित होतात आणि भारतात मुकपट उद्योग सुरु करायचा असा चंग बांधतात.
पण हे सगळे इतके सोपे नसते. प्रिंटींगप्रेसचा धंदा सोडलेल्या फाळक्यांच्या घरात पैसे नसतात, मात्र अजोड चिकाटी आणि महत्वकांक्षा असते. घरातील पै-नी-पै गोळा करुन आणि वर घरातील सामान विकुन ते या विषयीचा अभ्यास करतात आणि एक प्रोजेक्टर विकत घेतात (ज्यात फक्त फोटो पहायची सोय असते).

मुकपटाविषयी अधिक माहीती करुन घ्यावी यासाठी ते लंडनला जायचा बेत करतात व त्यासाठी कर्ज काढतात, वर बायकोचे दागीने गहाण टाकतात. लंडनला जाउन तिथे चित्रपटावर लिहिणा‍र्‍या मासिकाच्या ऑफिसात जाउन सरळ चित्रपट निर्मितीविषयी माहीती घेतात, आणि भारतात परत येवुन पहिल्या मुकपट बनविण्याच्या तयारित लागतात.

लंडनहुन कॅमेरा येतो, आणि मग कुठला मुकपट बनवावा यावर विचार सुरु होतो, मग ते राजा हरिश्चंद्रावर मुकपट बनविण्याचे ठरवितात, त्यानुसार कलाकारांसाठी शोध सुरु होतो, आणि अनेक अडथळ्यांसहीत चित्रपट पुर्ण होतो. पहिल्या एक-दोन दिवसात फारसा प्रतिसाद मिळत नाही, मग गल्लोगल्ली जाहीरात वगैरे करुन, आणि लकी ड्रॉ सारख्या योजना चालवुन अखेरीस मुकपट प्रचंड यशस्वी होतो. यानंतर फाळके अनेक धार्मिक चित्रपटांची निर्मीती करतात.

फाळकेंचा चित्रपट युरोपात सुद्धा प्रदर्शीत होतो, आणि इंग्रंजांकडुन प्रशंसा होते, तिथे चित्रपट बनविण्याचे त्यांना आमंत्रण मिळते पण फाळके ते सोडुन मायदेशात चित्रपट निर्मिती उद्योगाला चालना देण्यासाठी भारतात परत येउन चित्रपट निर्मिती चालु ठेवतात...

हा प्रवास चित्रपटात विनोदी अंगाने सादर केला आहे. तारामतीच्या भुमिकेसाठी स्त्री कलाकार शोधण्यासाठीचा शोध आणि प्रत्यक्ष मुकपटाच्या निर्मिती दरम्यानचे सिन तर झकास जमले आहेत. स्त्री पात्र साकारणार्‍या कलाकारांची मिशी कापण्यास केलेली टाळाटाळ, कारण केवळ बाप मेल्यावर मिशी काढतात असे समज...त्यावर दादासाहेबांचे स्पष्टीकरण वगैरे सिन्स अत्यंत मनोरंजक.

परेश मोकाशींचे दिग्दर्शन सुरेख आहे, तांत्रीक बाजु अगदी उत्तम आहेत. १९११-१९१५ चा काळ सुरेखपणे उभा केला गेला आहे, यासाठी नितिन देसाई यांच्या कलादिग्दर्शनाची मोलाची साथ मिळाली आहे. मला विशेष आवडलं ते सिनेमाचे पार्श्वसंगीत, आनंद मोडक आणि नरेंद्र भिडे यांचे खास अभिनंदन. प्रत्येक कलाकाराचा अभिनय उत्तम झाला आहे, फाळके झालेले नंदु माधव आणि त्यांच्या पत्नी असलेल्या विभावरी देशपाण्डे यांचे तर विशेष कौतुक. युटीवी सारख्या भक्कम निर्मिती संस्थेमुळे चित्रपटाचा स्टॅण्डर्ड अतिशय छान आहे...बघावाच असा...

Monday 1 February 2010

रण(२०१०)

दिग्दर्शक - राम गोपाल वर्मा

’ब्रेकिंग न्युज’ आणि संसेशनल न्युज या आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग झाले आहेत, प्रत्येक जण न्युज चॅनल्सना दोष देतो पण दिवस आणि रात्र तेच पहातो, आपण त्यांच्या इतक्या आहारी गेलो आहोत की त्यांच्या डोळ्यांनी आज आपण वास्तव पाहत आहोत, जे की वास्तवाचा केवळ आभास आहे, राजकारणी आणि पैसेवाल्या लोकांनी पत्रकारीता विकत घेवुन आपल्या डोळ्यांपुढे मायावी जाळे निर्माण करुन ठेवले आहे, मुळ झापडं बंद राहतील याची पुरेपुर काळजी घेतलेली आहे. याच ज्ञात(?) विषयावर रामगोपाल वर्मांचा ’रण’ आधारीत आहे.

विजय मलिक (अमिताभ बच्चन) इंडीया २४*७ या व्रुत्तवाहिनीचे मालक जे पत्रकारीता करताना मुल्य सांभाळुन, मसाला न घालता केवळ घडेल ते लोकांपुढे मांडत असणारे, व्रुत्त हे मनोरंजानेचे साधन मानणार्‍या लोकांच्या मानसिकतेमुळे त्यांच्या वाहिनीची लोकप्रियता घसरु लागते.  नुसत्या बातम्या सांगन्यापेक्षा प्रेजेंटेशन महत्वाचे मानणार्‍या अमरिश (मोहनिश बहल) याची वाहिनी मात्र लोकप्रियतेच्या शिखरावर असते. 
त्यातच नविन मालिका काढण्याचे प्लॅन सुरु झाले की त्याच धर्तीवरचे कार्यक्रम आधीच अमरिशच्या वाहिनीवर रुजु होतात. 



विजय मलिकचा मुलगा जय (सुदीप) वाहिनीच्या रेटींग वाढविण्यासाठी जे जे प्रयत्न करतो ते अमरिश हाणुन पाडतो.  जयला हाताशी धरुन जयचा भावोजी अश्वीन (रजत कपुर), आणि विरोधी पक्षनेता मोहन पांडे (परेश रावळ) या वाहिनीला हाताशी धरुन सत्ताधारी पक्षावर आतंकवादाचा खोटा आळ घालतात, आणि मोहन पांडे आपल्या मुख्यमंत्री पदाची वाट मोकळी करुन घेतो.  अश्वीन सुद्धा आपल्या पडीक प्रोजेक्ट्सला मंजुरी मिळेल म्हणुन यात सामिल असतो.  यानंतर हळुहळु विजय पेक्षा जय वाहिनीचा कारभार सांभाळु लागतो.  त्यांच्या वाहिनीवर मोहन पांडे बद्दल गुणगाण सुरु असते, नेमके हेच पुरब (रितेश) या नवपत्रकारला पचत नाही, ज्याचा विजय यांच्या सारख्या पत्रकारीतेवर विश्वास असतो.

याप्रकरणात काहीतरी काळेबेरे आहे आणि ते शोधले पाहीजे म्हणुन तो सेल्फ रिसर्च सुरु करतो आणि मोहन पांडे, अश्विन, जय आणि अमरिश यांचा पर्दाफाश करतो.

तसं पाहायला गेलं तर कथेत काही नाविन्य नाही, पण मिडियाच्या काळ्याबाजुंवर आधी प्रकाश कुणी टाकण्याचा प्रयत्न केला नव्हता.  राजकारणी मंडळी पत्रकारीतेला हाताशी धरुन न्युज तयार करतात आणि त्यांना पाहिजे तसे लोकांना नाचवतात.  या सर्वात आपण तद्दन मुर्ख ठरतो, हे कळुन आपल्याला वळत नाही, हीच शोकांतिका.

अमिताभने विजय मलिक अतिशय प्रभाविपणे साकारला आहे, शेवटच्या स्पिच आणि काही वेळा केवळ देहबोलीने तो असामान्य अभिनयाचे दर्शन देतो, त्याच्या व्यक्तीरेखेला मात्र सिनेमाच्या मध्याला कोपर्‍यात ढकललेले आहे.  परेश रावळ टिपिकल राजकारणी म्हणुन चोख भुमिका निभावतो.  रितेश आणि सुदिप यांनी कमाल केली आहे, दोघांनीही आपल्या भुमिकांना न्याय दिला आहे, रजत कपुर छोट्या भुमिकेत आहे, त्याला लिमिटेड स्कोप आहे.  मोहनिश बहल उत्तम.  गुल पनाग आणि नितु चंद्राला काही विशेष वाव नाही.  राजपाल यादव नेहेमीची ओवर ऍक्टींग करतो, पण आजकालचे न्युज रिडर तेच करत असल्यामुळे शोभुन दिसते... :)

रामगोपाल वर्माच्या सिनेमात नेहेमी असणारे वैशिष्ट्यपुर्ण कॅमेरा ऍंगल्स आणि ’गोविंदा’ टाईप पार्श्वसंगीत इथे सुद्धा आहे.  त्याची कॅमेरास्टाईल मला पर्सनली आवडत असली तरी कधी कधी ती अती टेक्निकल होते आणि पात्रांच्या चेहर्‍यावरच्या भावाकडे लक्ष न जाता आपण (मी ?) त्यातच भारावुन जातो, कधी कधी ते इरिटेटिंग सुद्धा होते, स्पेशली जेंव्हा हातांनी घेतलेल्या शॉट्स च्या वेळेस.  बाकी वेळेस मात्र खुप सही वाटते.  पार्श्वसंगीत बरेचदा भयानक सिनेमा प्रमाणे वाजते आणि संवाद एकण्यात व्यत्यय आणते.  बाकी तांत्रिक गोष्टी उत्तम आहेत.

शेवट परत थोडासा भरकटल्यासारखा... पण एकुण परिणाम ठीक.  मला आवडला, टिकाकारांसाठी ’कमेंट्स’ सेक्शन आहे ;-)