Saturday, 27 March 2010

फॉरेस्ट गम्प (१९९४)

दिग्दर्शक - रॉबर्ट झेमेकिस

बस स्टॉप वर बसची वाट पाहत बसलेला फॉरेस्ट बाजुला बसलेल्या बाईला आपल्या जीवनाची कहानी सांगायला सुरुवात करतो, ऐकनारे बदलत जातात पण आपण मात्र फॉरेस्टच्या जीवनपटात गुंग होऊन जातो.  १९९४ साली आलेला आणि ऑस्कर पारितोषिके मिळवणारा ’फॉरेस्ट गम्प’ विल्सन ग्रुमच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारलेला आहे.कमी आयक्यु असलेल्या फॉरेस्टला शाळेत प्रवेश नाकारला जातो, त्याच्या आईच्या प्रयत्नांमुळे तो शाळेत दाखल होतो, पण कमकुवत पायांमुळे पायांना ब्रेसेसचा आधार लावावा लागतो.  जेनी नावाची मुलगी सोडुन त्याचा कुणी मित्र नसतो.  असाच एकदा टारगट पोरं त्याच्या मागे लागतात आणि तो अडखळत पळायला सुरुवात करतो, आणि आश्चर्यकारकरित्या ब्रेसेस तोडुन तो उत्तम धावायला लागतो.  याच धावण्याच्या जोरावर कॉलेजमध्ये तो अमेरिकन फुटबॉलचा उत्तम खेळाडू होतो. 

पदवी मिळाल्यानंतर अमेरिकन आर्मीमध्ये दाखल होतो, विएतनाम मध्ये युद्धात सामिल होतो, तिथे त्याची मैत्री ’बब्बा’ नावाच्या अफ्रो-अमेरिकन तरुणासोबत होते. बब्बा आणि फॉरेस्ट त्यावेळी केवळ बब्बाच्या परंपरागत कोळी व्यवसायाबद्दल बोलणे होत असते आणि आर्मी मधुन निवृत्त झाल्यानंतर पार्टनर म्हणुन हा उद्योग करायचा असे ठरवितात. या युद्धात बब्बा मरण पावतो, त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात फॉरेस्ट अनेकांना वाचवतो, त्यात त्यांचा लेफ्टनंट डॅन सुद्दा असतो, डॅन दोन्ही पायांनी अधु होतो, आणि रणांगणावर विरमरण पत्करण्याएवजी अधु जीवन जगाव लागल्यामुळे फॉरेटवर नाराज होतो.  फॉरेस्टला ’मेडल ऑफ ऑनर’ मिळते.

आर्मीत असताना बंदुकिची गोळी लागल्यामुळे आराम करत असलेल्या फॉरेस्टला टेबल टेनिस (पिंग पॉंग) खेळण्याची सवय लागते आणि तो त्यात अत्यंत कुशल होतो, प्रसिद्ध होतो, यासाठी विशेष जाहिरात असलेली बॅट वापरण्यासाठी त्याला भरपुर पैसे मिळतात आणि तो बब्बाच्या घराकडे एक बोट विकत घेउन श्रिंपिंग व्यवसाय सुरु करतो, बब्बाची आठवण म्हणुन.  तिथेही मिळालेला पैसा तो बब्बाच्या घरी आवर्जुन देतो.

ह्या सर्व प्रवासात त्याची आणि जेनीची भेट होत असते,  पण जेनी कधीही त्याच्याकडे थांबत नाही आणि प्रत्येकवेळेस तिची जीवनशैली बदललेली असते, पण फॉरेस्टचे तिच्यावर प्रेम तसेच असते.
एकदा जेनी त्याच्या घरी असताना तो तिला लग्नाची मागनी घालतो पण जेनी नाही म्हणते, त्या रात्री त्यांचा शरीरसंबंध होतो पण दुसर्‍यादिवशी सकाळीच जेनी त्याला सोडुन निघुन जाते, या धक्क्यामुळे फॉरेस्ट धावायला सुरुवात करतो आणि सलग ३ वर्ष धावतो.

जेनीच्या पत्रामुळे तो तिला भेटण्यासाठी येतो, तिला आणि त्यांच्या मुलाला घेवुन घरी येतो, जेनी त्याला लग्नाबद्दल विचारते आणि हे पण सांगते की तिला न बरा होणारा आजार झाला आहे.   फॉरेस्ट तरीही तिच्यासोबत लग्न करतो....

फॉरेस्टच्या जीवनाच्या कथेमध्ये अमेरिकेतील मुख्य राजकिय आणि सामाजिक घडामोडींचा बॅकड्रॉप आहे,  अमेरिकेतल्या प्रत्येक राष्ट्रपती बरोबर तो भेटतो.  इतका असामान्य असुनही जीवनात छोट्या छोट्या गोष्टींचे महत्व सिनेमात जागोजागी दिसते.  प्रमुख भुमिकेत टॉम हॅन्क्स ने लाजवाब अभिनय केला आहे,  त्याची संवाद म्हणण्याची असामान्य लकब, बोलका चेहरा आणि डोळे....  हा सिनेमा पहायलाच हवा!

Tuesday, 16 March 2010

द मंचुरियन कॅन्डिडेट (१९६२)

दिग्दर्शक - जॉन फ्रॅन्केहायमर

१९६२ सालचा कृष्णधवल सिनेमा ’द मंचुरियन कॅन्डिडेट’ नुकताच पहाण्यात आला.  फ्रॅन्क सिनाट्रा, लॉरेन्स हार्वी आणि ऍन्जेला लांसबरी यांच्या अदाकारीने सजलेला हा थ्रिलर चित्रपट बघण्यासारखा आहे.

कोरियन युद्धावरुन परतलेल्या सैनिकांमध्ये रेमंड शॉ याला मेडल ऑफ ऑनर देण्यात येते, त्याची शिफारस करणारे कॅ. मार्को यांना नेहमी एक विचित्र स्वप्न पडत असते, ज्यात त्याची आर्मीची टीम कॅम्युनिस्ट रशियन्स आणि कोरियन्स पुढे बसलेली आहे, आणि त्यांच्यावर हिप्नॉटीझम प्रयोग होत आहेत, आणि सार्जेंट रेमंड शॉ हा दोन साथीदारांची संमोहीत अवस्थेत हत्या करतो.  मार्को यांना यामुळे असे वाटते की कोरियन युध्दादरम्यान असे काही झाले आहे की रेमंड शॉ सारक्या नावडत्या माणसाला त्यांनी शिफारस केलेली चुकीची आहे.  नेहमी ह्या स्वप्नांमुळे हैराण झालेले मार्को मिलिटरी ऑफिसर्सची मदत घेउ इच्छीतात, पण केवळ एक स्वप्न म्हणुन त्याला दुर्लक्षीण्यात येते.  साधारण अश्याच स्वरुपाचे स्वप्न अजुन एका साथीदाराला पडल्यानंतर मात्र आर्मी मार्को यांच्या मदतीला तयार होते.

रेमंड शॉचे आपल्या आईबरोबरचे संबंध व्यवस्थित नसतात, त्याची आई मिसेस आईस्लिन हीचा आपल्या सिनेटर नवर्‍यावर पुर्ण पगडा असतो आणि त्याची राजकिय काराकिर्द ह्याच चालवत असतात.  आपल्या स्वार्थापायी आपल्या मुलाचा प्रेमभंग करायला देखिल मागे पुढे पाहत नाहीत आणि वेळ प्रसंगी फायद्याकरिता आपली भुमिकाही बदलतात.  रेमंडला सगळं कळुनही तो नेहमी त्यापुढे नतमस्तक होत असतो, याच कारण म्हणजे त्याच्यावर कोरियन युद्धादरम्यान संमोहनाचा प्रयोग झालेला असतो.

ह्या संमोहनाचा त्याच्यावर काय परिणाम असतो आणि या सगळ्याचा मार्कोच्या स्वप्नांशी काय संबंध असतो आणि सगळ्यांची उकल मार्को कसा करतो तो चित्रपटाचा उत्तरार्ध.  चित्रपट उत्तम आहे आणि आपल्याला शेवटपर्यंत खिळवुन ठेवतो.