Friday, 23 April 2010

फुंक २ (२०१०)

दिग्दर्शक - मिलिंद गडागकर

परत एक राम गोपाल वर्माच्या कारखान्यातला सिनेमा, त्यात हॉरर थीम, अजुन एक भर म्हणजे सिक्वल.... पहावा का पाहू नये ? तसं पहायला गेलं तर नाविन्याची आशा फार कमी.
पण दिग्दर्शक तर नविन आहे ना? ट्राय करायला काय हरकत आहे? असेच अजुन काही प्रश्न मनात घेऊन आणि दुसरा कुठलाही चित्रपट पर्यायी नसल्यामुळे शेवटी फुंक २ पहायचं आम्ही ठरवलं.

जेव्हडं काही ऐकलं होतं त्यावरुन चित्रपटाकडुन खुप कमी आशा होत्या, आणि या अपेक्षेला चित्रपट जागला. कथा म्हणजे सरधोपट भयपटाची आहे, शहरापासुन दुर अश्या एकट्या बंगल्यात एक कुटुंब राहायला येतं, आणि मग भाग १ मध्ये मारलेल्या भुताने घेतलेला बदला.

स्पॉयलर अलर्ट..
भुत न दिसता दार अश्या पद्धतीने लावुन घेतं की कुणालाच ते उघडता येत नाही, पण सोफ्याआड लपलेले मनुष्य त्याला दिसत नाहीत. दोन मांत्रीकांना त्यांच्या घरात जाऊन मारणार्‍या भुताला एकाच बंगल्यातला लहान मुलांना मारता येत नाही, त्यासाठी २ तास खर्ची घालावे लागतात. भुत बदला घेताना नायकाला म्हणतं की मी तुझ्या आप्तांना तडपवुन मारणार आहे आणि प्रत्यक्षात त्यांचा वॉचमन, कामवाली बाई, दोन मांत्रीक मारण्यासाठी २ तास खर्ची घालतो, आणि बळे बळेच शेवटाला दोघांचे प्राण घेतो, शेवटतर अतर्क्यच, बायकोला मारुन बाकी फॅमिलीला निवांत सोडुन देतो.

अश्या भरमसाठ चुकांमुळे पहिल्या ४०-४५ मिनिटांनंतर सिनेमाची पकड ढिली होते, सुरुवातीला खरोखरीच काही सिनमध्ये भिती वाटते, वातावरण निर्मीतीसाठी सर्वात मदतगार ठरले ते सिनेमाचे पार्श्वसंगीत, बाकी सगळीकडे बोंबाबोंब. कॅमेरावर्क नेहमीप्रमाणे वर्मा स्टाईल, वेगळे काही नाही.

हॉलीवूडमध्ये भयपटांसाठी वेगवेगळे प्रयोग होत असताना (उदा. पॅरानॉर्मल एक्टिवीटी), अलिकडच्या काळात भयपटांची सातत्याने निर्मीती करणारे राम गोपाल वर्मा रामसेपटांच्या वर्तुळाबाहेर येऊ इच्छीत नाहीत, ’भुत’ चित्रपटाचा अपवाद सोडता, बाकी सगळे भयपट एकाच माळेचे मणी वाटतात.

सिनेमा पाहीला असेल तर माझ्या मतांशी सहमत असणारच आणि पाहीला नसेल तर अर्धे पैसे मला दया... :)

Tuesday, 13 April 2010

स्वदेस, वुई द पिपल (२००४)

दिग्दर्शक - आशुतोष गोवारीकर

अरविंद पिल्ललमरी आणि रवी कुचिमंची या एनआरआय जोडगोळींच्या कार्यावर आधारीत २००४ सालचा आशुतोष गोवारीकरांचा ’स्वदेस’ माझ्या आवडत्या हिंदी चित्रपटांच्या यादीत सर्वोच्च स्थानी आहे.  देशाबद्दलची थीम असुनदेखील बेगडी देशप्रेमाला दिलेला फाटा, आणि भारताच्या सद्यस्थितीचे उत्तम केलेले अवलोकन याच्या जमेच्या बाजु.  भारताने प्रगती जरी केलेली असेल तरी अजुनही ७०% ग्रामीण भारत अजुनही मागासलेला आहे.  शिक्षणसमस्या, वीजटंचाई, दारिद्र्य, बाल विवाह आणि सर्वात महत्वाची जाती व्यवस्था या सर्व समस्या, माणसांचे स्वभाव विशेष यासर्वांना हा चित्रपट स्पर्शतो.

कथा म्हणजे, अमेरीकेत नासा शास्त्रज्ञ असलेला मोहन भार्गव (शाहरुख खान) आपल्या लहानपणी सांभाळ केलेल्या कावेरीअम्मांना अमेरीकेत घेवुन जाण्यासाठी येतो, आणि भारतातिल खेड्यातल्या अनेक समस्यांसोबत त्याची ओळख होते.  अमेरीकेत राहील्यामुळे त्या बद्दल त्याला वाटणारे आश्चर्य, गावातील लोकांचे दुर्लक्ष, अनेकविध स्वभावाचे नमुने, प्रसंगी आलेली निराशा आणि काढलेला मार्ग यातुन सिनेमाची घडण होते.

सिनेमाचे एक-एक सिन्स वर्णन करण्याजोगे आहेत, सगळ्यात भावलेला प्रसंग म्हणजे, शेतकर्‍याच्या गावाहुन परत येणार्‍या मोहनची रेल्वे एका स्टेशनवर थांबते, त्या उन्हाच्या वेळी एक ८-९ वर्षाचे पोर २५ पैश्याला पाणी विकत असते, नेहमी बाटलीबंद (मिनरल वॉटर) पाणी पिणारा मोहन डबडबलेल्य डोळ्यांनी ते पाणी पितो. हा पाहण्यासारखा सिन आहे.  हरीदास या शेतकर्‍याची दैना ऐकुन अतिशय दु:खी झालेला मोहन शाहरुखने केवळ चेहर्‍याने दाखवलाय, एकही शब्द न बोलता.

केवळ व्यवसाय बदलला म्हणुन एका कुटुंबाला देशोधडीला लावण्यात येते,  घरात मुलांच्या अंगावर वितभर कपडे नसताना देखिल अतिथी देवो भव: म्हणुन पाहुण्यांना अन्न देणे तो गरीब कर्तव्य समजतो,  तर सरासर अन्याय असणार्‍या गोष्टींना समाज रीत समजतो.
दसर्‍याच्या दिवशी शाळेतल्या कार्यक्रमा दरम्यान अमेरिका कशी आहे याबद्दल गावकर्‍यांसोबत मोहनची चर्चा ’मेरा भारत महान’ वाल्यांनी ऐकायलाच हवी.  त्यातले मोहनचे ’जब भी हम मुकाबले में कम पडते है तो हम संस्कृती, परंपरा का आधार लेते है’ हे खासच.  मोहन निर्भयपणे म्हणतो ’मुझे नही लगता हमारा देश दुनियाका सबसे महान देश है, लेकीन ये जरुर मानता हुं के हममें वो काबिलियत है, अपने देश को महान बनाने की’...  बेगडी देशप्रेमापेक्षा हे झणझणीत अंजन खरंच उपयोगाचं आहे.

एकीकडे भारतातले सुशिक्षीत अमेरीकेत जाउन नासा सारख्या संस्थेमध्ये काम करत असताना गावात साधी वीज नसावी?  इंटरनेट, इमेल्स त्यांना परग्रहावरचे शब्द वाटावेत?
ब्राम्हण असणे म्हणजे केवळ पुजापाठ करावी?  खालच्या(?) जातींच्या लोकांना माणुस म्हणुन वागणुक नाही? ’संस्कृती’ बद्दल इतका अभिमान तरी वृद्धाश्रम भरलेले कसे?  मुलींच्या शिक्षणाबद्दल उदासिनता.. एक-न-एक अनेक समस्या आपल्याला अस्वस्थ करुन सोडतात.  या गोष्टी मोहन या अमेरिकेत राहणार्‍या माणसाला कळतात पण इथलेच लोक त्याबद्दल अतिव कोरडे असतात.

शास्त्रज्ञ असल्यामुळे शेवटचा वीज निर्मीतीचा प्रसंग केवळ हिरो असल्यामुळे सक्सेस झाल्याची भावना नाही येत. हे अजुन एक चित्रपटाचे यश.  एकदम शेवटची फिल्मी झालर सोडता संपुर्ण चित्रपट मला खुप भावतो.

३ तासांच्या या सिनेमात आशुतोष गोवारिकरने कमाल केली आहे, सिनेमा थोडाही कंटाळवाना होत नाही.  आशुतोषची प्रत्येक गोष्ट तपशिलवार दाखविण्याची सवय आहे, गावच्या इतिहासापासुन प्रत्येक समस्येच्या मुळाशी तपशिलवारपणे तो जातो.  शाहरुख नासाचा शास्त्रज्ञ असल्यमुळे खर्‍या नासामध्ये शुटींग केलेली आहे, आणि नासाच्या खर्‍याखुर्‍या प्रोजेक्टचे नाव सिनेमात वापरले आहे. शाहरुख खानच्या संयत अभिनयामागे आशुतोषचा खंबीर हात आहे. मी पाहीलेली शाहरुखची ही सर्वात उत्तम अदाकारी. गायत्री जोशी वगळता बाकी सर्वांचा अभिनय उत्तम झाला आहे. 

गाणी सगळी श्रवणीय असली तरी सावरियां हे कापायला हवं होतं.  पार्श्वसंगीत अगदी साजेसं आहे,  चित्रपटाच्या मुड नुसार मन काळवंडुन टाकतं आणि हलक्या सिन्सला फुलवतं. 

केवळ राजकारणी आणि इतरांना दोष देत बसुन न राहता केल्याने होत आहे चा संदेश देणारा हा सिनेमा संग्रही असावा असाच आहे.

Sunday, 11 April 2010

ट्रायांगल (२००९)

दिग्दर्शक - क्रिस्टोफर स्मिथ

कधी स्वत:चा सामना केला?  स्वत:ला समोर बघुन काय अवस्था होईल?  तुम्ही एका अनोळखी जागी जाता, पण आत कुठेतरी वाटतेय की आधी इथे भेट दिली आहे?  काही वेळापुर्वी घडलेले प्रसंग परत घडत आहेत?  आपल्या जीवनात असे काही विचित्र घडले तर आपली काय अवस्था होईल, ’ट्रायांगल’ हा सिनेमा अशीच एक गुंतागुंतीची कथा आहे...

जेस आपल्या आजारी मुलामुळे कायम दु:खी असते, ग्रेग तिचा मित्र तिला स्वत:च्या बोट वर समुद्र सफरीसाठी आमंत्रित करतो, जेणेकरुण एका दिवसाकरिता ती थोडी रिलॅक्स होऊ शकेल.  त्याच बोटीवर ग्रेगचे मित्र सॅली, डॉवनी, हिथर आणि त्याचा सहायक विक्टर सुध्दा सफरीला निघतात.

आरामात त्यांची सफर चालु असताना एकाएकी हवा स्थिर होते, त्यामुळे त्यांची बोट थांबते. अचानक दुरवर त्यांना घोंगावत येणारे वादळ दिसते, ग्रेग रेडीओ वरुन सागरी सहायक कक्षाला बोलतो पण वादळाचे कोणतेही निशान त्यांना त्यांची यंत्रे दाखवत नाहीत. काही क्षणातच त्या वादळाचा रोख त्यांच्याकडे वळतो त्याच्यापासुन वाचण्याचे त्यांचे प्रयत्न पुर्ण व्यर्थ जातात आणि सर्व पाण्यात पडुन बोट उलटते, काही क्षणातच वादळ निघुन जाउन स्वच्छ सुर्यप्रकाश पडतो, हिथर सोडुन सर्वांना ग्रेग पलटलेल्या बोटीवर ओढुन घेतो, हिथर मात्र कुठेच दिसत नाही.

हताश होऊन उपड्या बोटवर बसलेल्या सर्वांना आशेचा किरण म्हणुन एक महाकाय जहाज त्यांच्याकडे येताना दिसते, त्या जहाजावर ते चढतात.  आश्चर्यकारकरित्या त्या महाकाय जहाजावर कुणीच दिसत नाही, पण कुणीतरी मागावर आहे असा संशय जेसला नेहमी सतावत राहतो, ती जहाज आतुन पहाताना आधी ती इथे होती असे तिला नेहमी वाटत राहते.  अचानक त्यांच्यावर हल्ले व्हायला सुरुवात होते....

..... यापुढे पटकथेत काळाच्या मर्यादा तोडुन अनेक प्रसंग येतात आणि ते निस्तरता निस्तरता नायिकेबरोबर आपण सुध्दा थकुन जातो.  सिनेमा संपल्यावर सुध्दा आपल्याला ठळक कथा कळत नाही कोडे शोधण्याचा विचार सतत रहातो.  कधी कधी सगळं समजणे आवश्यक सुद्धा नसते ना? 

अत्यंत क्लिष्ट अशी कथा, पटकथा लिहिण्यासाठी आणि तितक्याच ताकदीने दिग्दर्शीत करण्यासाठी क्रिस्टोफर स्मिथचे अभिनंदन करायला हवे.  सिनेमाचा लुक चांगला आहे, प्रमुख जेसच्या भुमिकेत मेलिसा जॉर्ज या अभिनेत्रीने उत्तम कामगिरी केली आहे,  बाकी योग्य साथ देतात.  डोक्याला मनोरंजक खुराक द्यायचा असेल तर हा अनुभव घ्यायलाच हवा.