Monday 8 August 2011

४०४ (२०११)

दिग्दर्शक - प्रवाल रमन

http://www.imdb.com/title/tt1883121/

राम  गोपाल वर्माच्या 'फॅक्टरी'तून बर्‍याच काही चांगल्या गोष्टी बाहेर आल्यात, आणि अर्थात वाईटही.  चांगल्या गोष्टींमध्ये काही उत्तम दिग्दर्शक भेटत आहेत ज्यांनी आधी वर्माच्या हाताखाली सहायक दिग्दर्शन केलं होतं.  जॉनी गद्दार वाला श्रीराम राघवन तसेच प्रवाल रमन.  प्रवाल रमनचे 'फॅक्टरी' बॅनरचे सिनेमा यथातथाच होते उ.दा. डरना मना है, डरना जरूरी है, गायब वगैरे.  पण त्यातही कंसेप्च्युअल लेव्हलवर बर्‍यापैकी प्रयोग होते.  डरना मना है अन जरूरी मध्ये एका कथेऐवजी सहा कथा, गायब मध्ये गायब होणार्‍या पण मिस्टर इंडिया किंवा तत्सम सुपरहिरो ऐवजी सामान्य स्वप्नाच्या माणसाची कथा असा थोडा वेगळा प्रकार होता.

बॅनर बाहेरचा पहिलाच '४०४' हा सिनेमा मात्र त्याच्या पुर्वीच्या सर्व सिनेमांहून खूप सरस आहे.  सिनेमाचं सार पहायला गेलं तर तसं एका भयपटाला साजेसं आहे, पण त्यातही मनोवैज्ञानिक आणि मानसिक गुंतागुंत तयार करून उत्तम पटकथेसह आणि नव्या पण उत्तम दर्जाच्या अभिनेत्यांसह प्रवाल रमनने एक सुखद धक्का दिला आहे.  परत एकदा मोठी स्टारकास्ट, भरमसाठ बजेट, भव्यदिव्य सेट्स, लोकेशन्स नसतानाही उत्तम सिनेनिर्मिती होऊ शकते हे सिद्ध होतं.

'४०४' कथा आहे, एका वैद्यकीय महाविद्यालयाची, ज्यात नवी बॅच येते, सालबादाप्रमाणे इथेही सिनियर ज्युनियर्सची रॅगिंग घेतात, त्यात एक मुलगा अभिमन्यु (राजविर अरोरा) सिनियरच्या दबावाला न जुमानता त्यांच्याविरुद्ध तक्रार करतो, आणि त्यांचा रोष ओढवून घेतो.  त्यांच्या हॉस्टेल मध्ये रूम नं ४०४ मध्ये २-३ वर्षांपुर्वी एका मुलाने आत्महत्या केली असते, तेंव्हापासून ती रूम कुलूपबंद ठेवलेली असते, अभिमन्यु हा भुत-प्रेत हे मानत नाही आणि तो त्या रूम मध्ये राहण्याचा आग्रह करतो, त्याला पाठींबा देतात ते प्रोफेसर अनिरुद्ध (निशिकांत कामत),  अनिरुद्ध हे जगप्रसिद्ध वैज्ञानिक असून त्यांची अनेक पुस्तके तसेच प्रबंध असतात. 

निशिकांत कामत
त्या रूममध्ये गेल्यावर मात्र अभिमन्युला भूताटकी जाणवू लागते आणि त्याला मानसिकरित्या सिनियरही खतपाणी घालतात, मात्र प्रोफेसर अनिरुद्ध त्याला पाठींबा देतात आणि त्याला यातनं बाहेर काढण्याची पुर्ण हमी देतात.  मग हा भूताटकी प्रकार खरा का खोटा?, मानसिक किती अन खरं किती? जे दिसतं ते खरंच असतं का?  असे अनेक प्रश्न, उपप्रश्न पडत जातात.   प्रोफेसर आणि अभिमन्युच्या चर्चेतून बरंचसं जड मनोवैज्ञानिक आपण ऐकतो आणि त्या पात्रांच्या मानसिकतेत गुरफटत जातो. शेवटाला तर अनेक धक्के अन परमोच्च शेवट होतो आणि आपल्याला एक उत्तम सिनेमा पाहिल्याचा अनुभव मिळतो.

सिनेमा सर्व बाबतीत उजवा आहे, दिग्दर्शन, कथा, पटकथा, अभिनय, नवोदित असूनही अभिमन्युच्या भुमिकेत राजविर अरोराने उत्तम काम केलंय, त्याला तगडी (आणि आश्चर्यकारक) साथ आहे ती प्रोफेसरच्या भुमिकेतल्या दिग्दर्शक निशिकांत कामतांची(डोंबिवली फास्ट आणि मुंबई मेरी जानचे दिग्दर्शक), सिनियर इमाद (नसिरूद्दिन शाह चा मुलगा), आणि टिस्का चोप्रा सर्व उत्तम.  घ्यायलाच हवा असा वेगळा अनुभव...8 comments:

 1. ऐकलं होतं याच्याबद्दल.. पण एवढा सहीये हे माहित नव्हतं .. धन्स रे.. विश लिस्टीत जोडलाय.. :)

  ReplyDelete
 2. मला हा कुठल्यातरी इंग्लिश सिनेमावरून ढापल्यासारखा वाटतोय.. चेक करायला हवं!

  ReplyDelete
 3. धन्स हेरंब..

  धन्स विभि.. चेक करून सांग.. आणि असलातरी ढापलेली चांगली उदाहरणं कमीच मिळतात... :-)

  ReplyDelete
 4. मला माहीतच नव्हतं असा सिनेमा आलाय ते. बरं झालं तू लिहीलसं त्यामुळे कळलं तरी. पाहायला हवा. :)

  ReplyDelete
 5. चला , नक्कीच काहीतरी नवीन पाहायला मिळेल.

  ReplyDelete
 6. अरे हा सिनेमा आला तेव्हाच पाहिला होता आणि तेव्हाच खूप आवडलेला...सिनेमाच्या बझावर लिहल ही होत मी ह्याबद्दल....

  ReplyDelete
 7. पहायला हवा रे सिनेमा....तसं मला भूतं बितं पहायला झेपत नाहीत, त्यात रामूची गॅंग म्हटलं की आणि नको वाटतं.... पण रामू फॅक्टरी बाहेरचा आणि तू रेकमेंड केलेला म्हटल्यावर हिंमत वाढलीये बघ!!!

  ReplyDelete
 8. हा सिनेमा एक अत्यंत दुर्लक्षित रत्न आहे.... कुठेही काडीमात्रही चर्चा न होता दुर्लक्षित मरण आल्यासारखा.

  डोक्याला गिरमिट लावणारा सिनेमा आहे हा ...

  या ब्लॉग वर या सिनेमाविषयी अख्खी एक पोस्ट पाहून परमसंतोष जाहला.

  "मोठी स्टारकास्ट, भरमसाठ बजेट, भव्यदिव्य सेट्स, लोकेशन्स नसतानाही उत्तम सिनेनिर्मिती होऊ शकते हे सिद्ध होतं " >> हे १०१% खरे आहे. पण इतक्या झकास सिनेमाचे शून्य प्रमोशन होणे, चुकीच्या वेळी दबकत दबकत रिलीज करणे म्हणजे स्वतःच्याच पोराच्या नरडीला नख लावणे आहे. किमान एक तरी माहितीतला चेहरा सिनेमामध्ये असायला पाहिजे होता. तसे झाले असते तर हा सिनेमा खूप लोकांनी पहिला असता हे नक्की.

  ReplyDelete