दिग्दर्शकः गिल जंगर
बर्यापैकी टिपीकल टीन सिनेमा असूनही दिग्दर्शन, अभिनय, पटकथा या पातळींवर चांगला असल्यामुळे गिल जंगर दिग्दर्शित '१० थिंग्स आय हेट अबाउट यू' पहाणेबल झाला आहे. मी हा सिनेमा पाहीला कारण यात हिथ लेजर आहे. शेक्स्पीअरच्या 'The Taming of the Shrew' या नाटकावर आधारीत.
कॅमेरॉन (जोसेफ गॉर्डन लेविट) कॉलेजात नव्यानं दाखल होतो, आणि बिआंका या सुंदर मुलीच्या लव्ह ऍट फर्स्ट साईट प्रथेप्रमाणे प्रेमात पडतो. पण बिआंकाचे डॉक्टर वडील पदवीआधी प्रेम किंवा डेटिंगच्या विरोधात असतात. बिआंकाची बहीण कॅट (ज्युलीया स्टाईल्स) देखिल प्रेमाच्या किंबहुना मुलांच्या विरोधात असते. बिआंकाला हे सर्व पटत नसते, पण वडिलांसमोर आणि कॅट समोर तिचं चालत नाही. त्यात ती खुप आग्रह करते पण तिचे वडील एक अट टाकतात, जर कॅट डेटवर जात असेल तर बिआंकाला जाता येईल.
आता कॅटसारख्या रागीट स्वभावाच्या मुलीसाठी मुलगा शोधणं कॅमेरॉनला भाग पडतं. मग तो पॅट (हिथ लेजर) या कॅटसारख्याच स्वभावाच्या मुलाला तयार करतो, त्यासाठी जो या बिआंकावर लाईन मारणार्याकरवी. हो नाही करता पॅट आणि कॅट दोघही प्रेमात पडतात तसेच आधी जो कडे आकर्षीत असणारी बिआंका कॅट कडून जो विषयी कटू अनुभव ऐकल्यावर कॅमेरॉनच्या प्रेमात पडते. मग डेट करण्यासाठी घेतलेल्या पैश्यावरून कॅट आणि पॅट च्या संबंधात मीठाचा खडा पडतो, पण पॅट खरोखर प्रेम करू लागला आहे हे कळल्यावर परत शिरस्त्याप्रमाणे एकत्र येतात.
एकुण पुढे काय घडणार हे माहित असूनही सिनेमा बघावासा वाटतो यात ज्युलिया स्टाईल्स आणि हीथ लेजरचा महत्वाचा हात आहे. टीन सिनेमा असल्यामुळे बर्यापैकी प्रेडीक्टेबल आहे. एकदा बघायला हरकत नाही.
