
दोन भिन्न प्रवृत्तीची माणसं, एक हिटमॅन..ज्युलियन नोबल( पिअर्स ब्रॉसनन) बेफिकरी वृत्तीचा.. घर.. बायको, मुलंबाळं नसणारा.. आयुष्यात नेहमी मौजमजा करणारा.. दुसरा डॅनी राईट (ग्रेग किन्नर) स्वभावाने शांत.. अगदी घरघुती.. नाकासमोर चालणारा. योगायोगाने दोघांचीही भेट मेक्सिकोच्या एका बारमध्ये होते. डॅनी नौकरीतील अपयशाने खचलेला असतो आणि एका मोठ्या कॉन्ट्रॅक्टसाठी क्लायंट भेटीवर मेक्सिकोला आलेला असतो, तर ज्युलियन त्याच्या कामानिमित्त (असासिनेशन) तिथे आलेला असतो.
सुरुवातीच्या अडखळ्यानंतर दोघं सोबत फिरू लागतात आणि त्यांच्यातली मैत्री वाढू लागते. ज्युलियन हिटमॅन आहे हे डॅनीला पटत नाही पण मेक्सिकन बुल फाईटच्या सामन्यात ज्युलियन त्याला एक कट रचून दाखवतो, डॅनी घाबरतो पण ज्युलियन तो कट पुर्णत्वास नेत नाही. नंतर बोलताना ज्युलियन डॅनीला त्याच्या कामात मदत करण्यासाठी सांगतो, कारण अश्यात त्याच्या कामात चुका होऊ लागत असतात. डॅनी एकदम घाबरतो आणि ज्युलियनला परत भेटत नाही.
चार वर्षानंतर डॅनीच्या घरी ख्रिसमसच्या वेळी अचानक ज्युलियन आगंतुकपणे येतो, त्याच्याशी त्याच्या बायकोशी आपुलकीने बोलून मर्जी संपादन करतो आणि परत एकदा डॅनीला त्याच्या कामात शेवटची मदत करण्यास सांगतो, आणि हे काम फत्ते झाल्यावर त्याच्या जीवाचा धोका पुर्ण नाहीसा होईल असं सांगतो. डॅनी परत नकार देताच तो त्याला म्हणतो की डॅनी वर त्याचं एक ऋण आहे आणि ते परत करण्याचा हा एकमेव मार्ग आहे. ते ऋण कोणतं आणि डॅनी त्याला मदत करतो का? हे चित्रपटात पाहणं मजेचं आहे.
ज्युलियनच्या भुमिकेत पिअर्स ब्रॉसनन अगदी भन्नाट आहे, डॅनी रंगवलेला ग्रेग किन्नर त्याच्या नेहमीच्याच टेलरमेड भुमिकेत आहे, पण सगळा सिनेमा पिअर्स ब्रॉसननने खाऊन टाकला आहे. त्याला कॉमिक रोल मध्ये पहिल्यांदाच पाहिलंय आणि तो खूप आवडून जातो. शेवटाच्या अर्ध्या तासात सिनेमा अत्त्युच्च पातळी गाठतो अन कथानक भरपूर वळणं घेतं. पिअर्स ब्रॉसननच्या शानदार भुमिकेसाठी नक्की पाहावा असा...


