Friday 23 April 2010

फुंक २ (२०१०)

दिग्दर्शक - मिलिंद गडागकर

परत एक राम गोपाल वर्माच्या कारखान्यातला सिनेमा, त्यात हॉरर थीम, अजुन एक भर म्हणजे सिक्वल.... पहावा का पाहू नये ? तसं पहायला गेलं तर नाविन्याची आशा फार कमी.
पण दिग्दर्शक तर नविन आहे ना? ट्राय करायला काय हरकत आहे? असेच अजुन काही प्रश्न मनात घेऊन आणि दुसरा कुठलाही चित्रपट पर्यायी नसल्यामुळे शेवटी फुंक २ पहायचं आम्ही ठरवलं.

जेव्हडं काही ऐकलं होतं त्यावरुन चित्रपटाकडुन खुप कमी आशा होत्या, आणि या अपेक्षेला चित्रपट जागला. कथा म्हणजे सरधोपट भयपटाची आहे, शहरापासुन दुर अश्या एकट्या बंगल्यात एक कुटुंब राहायला येतं, आणि मग भाग १ मध्ये मारलेल्या भुताने घेतलेला बदला.

स्पॉयलर अलर्ट..
भुत न दिसता दार अश्या पद्धतीने लावुन घेतं की कुणालाच ते उघडता येत नाही, पण सोफ्याआड लपलेले मनुष्य त्याला दिसत नाहीत. दोन मांत्रीकांना त्यांच्या घरात जाऊन मारणार्‍या भुताला एकाच बंगल्यातला लहान मुलांना मारता येत नाही, त्यासाठी २ तास खर्ची घालावे लागतात. भुत बदला घेताना नायकाला म्हणतं की मी तुझ्या आप्तांना तडपवुन मारणार आहे आणि प्रत्यक्षात त्यांचा वॉचमन, कामवाली बाई, दोन मांत्रीक मारण्यासाठी २ तास खर्ची घालतो, आणि बळे बळेच शेवटाला दोघांचे प्राण घेतो, शेवटतर अतर्क्यच, बायकोला मारुन बाकी फॅमिलीला निवांत सोडुन देतो.

अश्या भरमसाठ चुकांमुळे पहिल्या ४०-४५ मिनिटांनंतर सिनेमाची पकड ढिली होते, सुरुवातीला खरोखरीच काही सिनमध्ये भिती वाटते, वातावरण निर्मीतीसाठी सर्वात मदतगार ठरले ते सिनेमाचे पार्श्वसंगीत, बाकी सगळीकडे बोंबाबोंब. कॅमेरावर्क नेहमीप्रमाणे वर्मा स्टाईल, वेगळे काही नाही.

हॉलीवूडमध्ये भयपटांसाठी वेगवेगळे प्रयोग होत असताना (उदा. पॅरानॉर्मल एक्टिवीटी), अलिकडच्या काळात भयपटांची सातत्याने निर्मीती करणारे राम गोपाल वर्मा रामसेपटांच्या वर्तुळाबाहेर येऊ इच्छीत नाहीत, ’भुत’ चित्रपटाचा अपवाद सोडता, बाकी सगळे भयपट एकाच माळेचे मणी वाटतात.

सिनेमा पाहीला असेल तर माझ्या मतांशी सहमत असणारच आणि पाहीला नसेल तर अर्धे पैसे मला दया... :)

18 comments:

  1. बाप रे.... वाचूनच भीती वाटायला.. रामूची रे !!! :P

    ReplyDelete
  2. हे..हे.. हेरंब...खरंय

    ReplyDelete
  3. हे हे भयकथा आहे का विनोदी.वाचून तर वाटतय विनोदीच असावा.

    रामूच्या चित्रपटाबाबत मी असच करतो जास्त अपेक्षा न ठेवता जायचं पाहायला.

    ReplyDelete
  4. सचिन खरंय, जास्त अपेक्षा ठेऊन नाही जायचं, वर्मांनी आपल्या पुर्वकर्तुत्वावर स्वतःच बोळा फिरविला आहे...

    ReplyDelete
  5. भयपटांच्या वाटेला आपण जात नाय बॉ.. पण तरीही, रामूने ’अशी’ भिती दाखवावी? :)
    सत्या, सरकारचे दिवस लवकर विसरला तो.

    ReplyDelete
  6. सत्या, सरकारचे दिवस तो केंव्हाच विसरला आहे... पण एका चांगल्या दिग्दर्शकाची ही अधोगती मनाला त्रास देते...

    ReplyDelete
  7. बा अदब.. बा मुलाहिदा होशियार.. फुंक ३ जल्दही आने वाला है............ कालची बातमी :(

    ReplyDelete
  8. म्हणजे ही आधिची दोन पोरटी चांगली होती, असा त्याला पक्का विश्वास आहे की काय? :(

    ReplyDelete
  9. महेंद्रकाका बापरे... तसं याही भागात भुताच्या (आणि प्रेक्षकाच्या) आत्म्याला शांती नाही लाभली, तिसर्‍या भागासाठीच भुताला भटकवत ठेवले आहे बहुतेक...

    ReplyDelete
  10. मीनल, वादच नाही, रामुला विश्वास आहेच, फक्त बघायचं आहे फायनान्स कोण करणार याला ;-)

    ReplyDelete
  11. रामूच्या चित्रपटांच्या फंदात मी गेल्या अनेक वर्षात पडलेले नाही...आणि आता तर हे परिक्षण वाचून कधी चुकून कुठे दिसला तरी फुंक नको रे बाबा.....(कुठलीच १,२,३,.... :) )

    ReplyDelete
  12. योग्य निर्णय तन्वी.... रामु सिनेमा निव्वळ फुंकुन टाकतोय आज काल

    ReplyDelete
  13. आमचे पैसे आणि वेळ फुंकण्यापासुन वाचवल्याबद्द्ल धन्यवाद....

    ReplyDelete
  14. सारीकाजी, ब्लॉगवर स्वागत.. पोस्टमध्ये आधीच लिहिल्याप्रमाणे अर्धे पैसे माझ्या अकाउंट मध्ये जमा करावेत ;-)

    ReplyDelete
  15. का रे...अर्ध्या पैश्यांमध्ये पुन्हा कोणी तिकीट देणार आहे का?

    ReplyDelete
  16. हे पैसे जमा करुन मी फुंक ३ पाहणार आहे ;-)

    ReplyDelete
  17. एक काळ होता, जेव्हा माझ्याकडचं एक स्क्रिप्ट मी रामूकडे घेऊन जायचा विचार करत होते. आता नको वाटतं. लोक उगाच मलापण धरून मारतील.

    ReplyDelete
  18. हाहा, सुज्ञ निर्णय...

    ReplyDelete