Wednesday, 4 August 2010

क्रॅमर वर्सेस क्रॅमर (१९७९)

दिग्दर्शक - रॉबर्ट बेन्टन

तो आज प्रचंड खुष असतो, तो काम करत असलेल्या ऍड कंपनीत सर्वोच्च महत्वाच्या क्लायंटचं काम सोपवण्यात येतं, कारण त्याची काम करण्याची क्षमता आणि झोकून देण्याची वृत्ती.  या क्लायंटला जर खुष केलं तर त्याच्या कंपनीचा फायदा होणार असतो.  त्या खुषीतच तो घरी येतो, ऑफिसमध्ये एक अर्जंट कॉल करत असतानाच ती त्याला एक धक्कादायक बातमी देते.  ती त्याला आणि त्यांच्या लहान मुलाला सोडून जाणार असते, कारण त्याचं स्वत:पुरतं वागणं, तिच्या अस्तित्वाची दखल न घेणं, घरासाठी वेळ न देणं.  ती बाहेर पडते ते स्वत:ची ओळख मिळविण्यासाठी.  तो एकदम धक्क्यात, आठ वर्षाचा संसार मोडून निघालेली बायको, आजच ऑफिसात वाढलेली जवाबदारी, शाळेत जाणारं मुल, आणि त्याच्या संगोपणाचा पडलेला भार.

इतके दिवस बायको असल्यामुळे घर आणि मुल सांभाळण्याची कधीही गरज न पडलेला पण आता तिहेरी कसरत करावी लागणार म्हणुन काळजीत.  आठ वर्षात कधीही बाहेर पडली नाही म्हणुन ती परत लवकर येईल अशी त्याची आशा हळूहळू मावळत जाते. या सर्वात फरफट होते त्यांच्या मुलाची. आई घेत असलेली काळजी, ती देत असलेला वेळ, तिचा समजुतदारपणा, प्रेम हे त्याला मिळेनासं होतं.  त्याला आपल्या कामातून कमी वेळ मिळतो, घरकाम येत नाही, मग ब्रेकफास्ट बनवताना होणारी तारांबळ, मुलाचा हट्टीपणा, जेवण्याचे प्रॉब्लेम्स त्यातुन मुलाबरोबर होणारं भांडण अश्या समस्यात दोघे अडकतात.

पण हळूहळू काही महिन्यांत ते परिस्थितीला सामोरे जाऊन एकमेकात ऍडजस्ट व्हायला लागतात, जिव्हाळा वाढायला लागतो.  मुलाला खेळता खेळता इजा पोचते तेंव्हा अक्षरश: रस्त्याने पळत त्याला हातात घेऊन तो हॉस्पीटल गाठतो, दोघांचे बंध वाढायला लागतात.

ती काही महिन्यांच्या प्रयत्नानंतर एका जॉबला लागली आहे, रोज मुलाच्या शाळेजवळ येऊन त्याला न भेटताच केवळ त्याच्याकडे बघत आहे, त्याला भेटायची तिला अनिवार इच्छा आहे. स्वत:च्या पायावर उभी राहील्यामुळे आणि आत्मविश्वास उंचावल्यामुळे तीच्या मनात आता मुलाला स्वत:कडे ठेऊन घेण्याचे येत आहे.  मग ती तिच्या वकीलामार्फत त्याला लीगल नोटीस पाठवते.

मुलाच्या संगोपणामुळे ऑफिसची नवी जवाबदारी समर्थपणे न पेलू शकल्यामुळे त्याला ऑफिसमधुन काढण्यात येतं, त्यातच तीच्या नोटीस मुळे मुल जर त्याला आपल्याजवर ठेऊन घ्यायचं असेल तर अत्यंत पैश्यांची गरज असते,  मग चोविस तासात त्याच्या अनुभवापेक्षा कमी मानधन आणि खालची पोजीशन असलेली नौकरी तो स्विकारतो आणि खटला लढतो.

पुढे काय होतं ते चित्रपटात पाहणंच योग्य.

क्रॅमर वर्सेस क्रॅमर चं प्रमुख यश म्हणजे नायक डस्टीन हॉफमन आणि नायिका मेरिल स्ट्रीप, जबरदस्त पटकथा आणि काही अप्रतिम सिन्स.  ती गेल्यावर त्याची ब्रेकफास्ट बनविताना होणारी कसरत, शेवटी ब्रेकफास्ट सीन, मुल घसरगुडीवरून पडल्यावर त्याचं त्याला हातात घेऊन हॉस्पीटल गाठणं, भांडण झाल्यावर दुसर्‍या सकाळी मुलाची माफी आणि आई आपल्यामुळे सोडून गेली याची भावना, मुलाला सायकल शिकवणं, कोर्टातले सिन, आणि शेवटाचा लिफ्ट मधील सिन......


डस्टीन हॉफमनने आधीचा वर्कोहॉलीक माणुस आणि नंतरचा हळवा बाप अविस्मरणीय साकारला आहे, मेरिल स्ट्रीपची हळवी पण स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव असणारी पण मुलासाठी जीव तुटणारी आई समर्थपणे साकारली आहे, ती दिसतेही अतिशय सुंदर, त्यांना योग्य साथ आहे मुलाची आणि त्यांच्या मैत्रिणीची.

पाहणं एकदम मस्ट!

(आपल्याकडे याचा ऍव्हरेज अवतार येऊन गेला आहे 'अकेले हम अकेले तुम')

23 comments:

 1. खरंच.. अतिशय सुंदर चित्रपट आहे हा. त्या मुलाच्या डोळ्याला टाके घालण्याच्या सीनमध्ये माझ्या जीवाचा अक्षरशः थरकाप उडाला होता.

  पण 'अकेले हम अकेले तुम' ही मला तेवढाच आवडला.. फार कमी चित्रपटांचे एवढे सुंदर रिमेक्स बनवतात आपले लोक..

  ReplyDelete
 2. शेवटला सीन.. त्याला फ्रेंच टोस्ट बनवता येतात तो खूप मनाला भिडतो. खूप छान सिनेमा आहे.

  ReplyDelete
 3. कमीतकमी चार-पाच वेळा पाहिला असेन... अप्रतिम. मलाही ’अकेले हम अकेले तु” ही तितकाच आवडला होता. फक्त शेवटच्या सिनमध्ये अमीरचे कोर्टात सूट घालून बसणे टाळले असते तर बरे झाले असते. :D

  ReplyDelete
 4. ओरिजीनल पाहिलेला नाही फक्त डुफ्लिक्येटच पाहिलेला आहे ...त्याला रिमेक म्हणुया हवे तर....अकेले हम अकेले तूम मात्र मनापासून आवडला होता.... आता मात्र हा देखील मिळवून पहायला हवाय!!

  ReplyDelete
 5. अकेले हम अकेले तूम पाहिला व्हता...तो आवडला व्हता...हा नाही पाहिला...बघितला पाहिजे.

  ReplyDelete
 6. महेंद्रकाकांच्या संबंधित पोस्टवर सुद्धा हीच कॉमेंट दिली होती.
  शेवटचा सीन स्क्रिप्टमध्ये नव्हता...तो खरोखरचा डस्टिन आणि मेरिलमधला संवाद होता..त्या दोघांना वाटत होतं की सीन कट झालाय...आणि तो इतका जमल्यागत वाटला की दिग्दर्शकाने तसाच ठेवला..
  सिनेमा मस्तच आहे!

  ReplyDelete
 7. परिक्षण वाचून चित्रपट पहावासा वाटतोय. अ.ह.अ.तु. यावरूनच बेतलेला असावा असा संशय होताच, तो खरा होता हे तू शेवटच्या ओळीत स्पष्टच केलं आहेस. डस्टीन हॉफमन आणि मेरील स्ट्रीप म्हटल्यावर काय बोलणार? बाकी अ.ह.अ.तु. मधे सिंगर बनण्याची आकांक्षा बाळगणारी स्त्री नंतर स्वत:च्या पायावर उभी रहाताना अभिनेत्री का बनते, हे मात्र कळलं नव्हतं मला. क्रॅ. व्ह. क्रॅ. मधे असं काही तरू उटपटांग दाखवलं नसेल, ही अपेक्षा.

  ReplyDelete
 8. खरंय हेरंब, पहील्या ब्रेकफास्ट सिन नंतर प्रत्येक प्रसंगात जिथं लेक-बाप एकत्र आहेत ते सर्वच सीन अप्रतिम आणि हळवे करणारे आहेत, शेवटाचा ब्रेकफास्ट सीन तर अवर्णनीय.

  अकेले हम अकेले तूम वाईट नक्कीच नव्हता ऍव्हरेज या साठी की प्रेमप्रकरण अनावश्यक होतं आणि कांचन म्हणते त्याप्रमाणे अभिनेत्री होणं ती सुद्धा एकदम नं. १ अश्या फिल्मी फोडण्या मला थोड्या अती वाटल्या.. असो हॉलीवूड रिमेकपैकी बर्‍यापैकी बनलेला म्हणता येईल नक्कीच..

  ReplyDelete
 9. खरंय काका, तो सिन अतिशय सुंदर आहे...किंबहुना पुर्ण सिनेमाच सुंदर आहेच, तुमचा या सिनेमावरचा लेख सुद्धा अप्रतिम आहे.

  प्रतिक्रियेसाठी धन्यवाद!

  ReplyDelete
 10. श्रीताई, हा अप्रतिम सिनेमा आहे.. अकेले हम अकेले तुम साठी हेरंबला सांगीतलेलच..

  प्रतिक्रियेकरिता आभार..

  ReplyDelete
 11. तन्वीताई, नाहीssss... तो रिमेक नाहीच (हक्क विकत घेतले नव्हते) ;) तो डुप्लीकेटच... हा सरस चित्रपट आहे त्यापेक्षा... ;)

  ReplyDelete
 12. यवगेश नक्की बघ.. बेश्ट सिनेमा आहे... ५ ऑस्कर विजेता..
  बेस्ट पिक्चर, बेस्ट डायरेक्टर, बेस्ट ऍक्टर इन लिडींग रोल(मेल), बेस्ट ऍक्टर इन सपोर्टींग रोल(फिमेल), बेस्ट स्क्रीनप्ले...

  ReplyDelete
 13. बाबा, मस्त जमलाय तो सिन.... एकुणात सिनेमा एकदम बेष्ट..

  ReplyDelete
 14. डस्टीन हॉफमन आणि मेरील स्ट्रीप म्हटल्यावर काय बोलणार?

  एकदम खरंय कांचन.... जबरी सिनेमा आहे...
  अकेले हम अकेले तुम बद्दल हेरंबला सांगितलेलच...

  प्रतिक्रियेकरीता धन्यवाद...

  ReplyDelete
 15. पहायला हवा..
  काही प्रसंग लिहले आहेस त्यावरुन Pursuit of Happyness ची आठवण झाली.

  ReplyDelete
 16. वा मीनल.. काय छान आठवण काढलीस !!

  Pursuit of Happyness हा वडील आणि मुलाचं नातं दाखवणारा एक सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. विल स्मिथ चा मला सगळ्यात आवडलेला चित्रपट !!

  ReplyDelete
 17. होय मीनल पहायलाच हवा असा हा चित्रपट आहे.
  Pursuit of Happyness हा सुद्धा अत्यंत सुंदर चित्रपट आहे.

  ReplyDelete
 18. Pursuit of Happyness हा वडील आणि मुलाचं नातं दाखवणारा एक सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. विल स्मिथ चा मला सगळ्यात आवडलेला चित्रपट !! + १

  ReplyDelete
 19. Anand:Wwatch Pedar by Majid Majidi,I will always recommend that first whenever it Comes to this Genre,BTW any reason on what you did?

  ReplyDelete
 20. Thanks Anee for Pedar suggestion, I will try to get that.

  Sorry I did not got your question "BTW any reason on what you did?"

  ReplyDelete
 21. sorry for replying so late,that wasn't for you.Extremly sorry for late reply

  ReplyDelete
 22. Khubsoorat.

  I still don"t know how to enjoy English cinema

  ReplyDelete
 23. Vasant,
  You need to watch it! That's all! :)

  Thanks for visiting the blog.

  ReplyDelete