Sunday, 22 May 2011

ब्रुबेकर (१९८०)

दिग्दर्शक - स्टुअर्ट रोझनबर्ग
वेकफिल्ड तुरुंगात काही नव्या कैद्यांची भर पडते,  त्यात ब्रुबेकर हा ही एक कैदी असतो.  तुरुंगात आल्याआल्या केसं नीट कापण्यासाठी किंबहूना इजा न होता केसं कापण्यासाठी तिथल्या न्हाव्याला पैसे चारावे लागतात.  जेवणात सॅंडविच वगैरेसाठीही पैसे चारावे लागतात,  कधीकधी अधिकार्‍यांच्या लैंगिक शोषणालाही बळी पडावं लागतं.  मार खाणं आणि प्राथमिक असलेल्या वैद्यकीय सेवेसाठीही डॉक्टरलाही पैसे चारावे लागतात, थोडक्यात तुरुंगात अधिकारी आणि काही कैद्यांनी संपुर्ण अराजक माजवलेलं असतं.
सगळं पाहून एके दिवशी ब्रुबेकर जाहिर करतो की तो कैदी नसून नविन तुरुंगाधिकारी आहे आणि तुरुंगाची अवस्थेचा अभ्यास करण्यासाठी सामान्य कैदी म्हणून तिथं आला होता.  त्यानंतर तो सुत्रं हाती घेतो आणि तुरुंगाचा कायापालट करायचं ठरवतो.

तुरुंगातल्या काही वरिष्ठ कैद्यांना सोबत घेऊन तो चांगल्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करतो.   पण ह्यामुळे वर्षानुवर्ष भ्रष्टाचाराने बटबटलेल्या तुरुंगातील अधिकार्‍यांची धाबे दणाणते.  एकदा छत कोसळल्यामुळे कैदी जखमी होतात तर त्यावेळीही डॉक्टर जखमी कैद्यांकडून पैसे उकळायला पाहतो, ब्रुबेकरच्या कानावर हे पडताच तो डॉक्टरला हाकलवून लावतो आणि नव्या डॉक्टरला बोलावतो, त्यातच त्याला हे कळतं की छताचा विमा नाही आहे, आणि ज्या गोष्टींचा विमा आहे त्या गोष्टी मुळातच नाहीत.

तुटलेलं छत दुरुस्त करण्यासाठी एक कॉन्ट्रॅक्टर स्वतःहून येतो आणि पैश्यांचं आमिष दाखवतो,  तेंव्हा त्यालाही ब्रुबेकर दरवाजा दाखवतो.
पण हे सर्व तुरुंगातल्या अधिकार्‍यांना आणि तुरुंग समितीला आवडत नाहीत, त्यात तुरुंगात टॉर्चर आणि खूनही होतात हे ब्रुबेकरला कळतं आणि तो पुराव्यासाठी मृतदेह पुरलेल्या जागी खोदकाम करायचं ठरवतो, ह्या निर्णयामुळे धाबे दणाणलेलें लोकं समिती, गव्हर्नरवर दबाव आणून ब्रुबेकरला कामावरून कमी करतात. त्यातही कैद्यांचा मात्र त्याला संपुर्ण पाठींबा लाभतो, अश्रुपुर्ण डोळ्यांनी तो तुरुंग सोडतो.   चित्रपटाच्या शेवटी दाखवलंय की त्यानंतर दोन वर्षांनी चोवीस कैद्यांच्या एका कोर्टातल्या केस मुळे तुरुंगाची छळातून मुक्तता होते, आणि ब्रुबेकरचं कार्य सफल होतं.

हा सिनेमा सत्य घटनेवर आधारीत आहे, "थॉमस मर्टन" या अधिकार्‍याच्या स्वतःच्या पुस्तकावर ("Accomplises to the Crime: The Arkansas Prison Scandal") सिनेमाची गोष्ट लिहिली आहे.  रॉबर्ट रेडफर्डचा अभिनय आणि स्टुअर्ट रोझनबर्गच्या दिग्दर्शनासाठी नक्कीच पहायला हवा.

8 comments:

 1. मस्तच! डालो करुन बघतो !!

  ReplyDelete
 2. अन्यायाविरुध्द लढणारे सिनेमे मला आवडतात. :) पाहायला हवा.
  आढावा छान!

  ReplyDelete
 3. मस्तच !! नक्की बघतो..
  शॉशॉंक आठवला.

  ReplyDelete
 4. एग्झॅक्टली हेरंब... आता कुठलाही तुरुंगाशी निगडीत सिनेमा पाहिला तर शॉशांकची आठवण येणारच!!! धन्स ...

  ReplyDelete
 5. वाह आनंदा, ठेवतो डाऊनलोडला...

  धन्स रे... आज परत एकदा शॉशॉंक बघितला, हा बघतो लवकरंच :)

  ReplyDelete
 6. आभार सुहास.. शॉशांक इम्मोर्टल आहे ...

  ReplyDelete