Monday 15 February 2010

हरिश्चंद्राची फॅक्टरी (२००९)

दिग्दर्शक - परेश मोकाशी.
ऑस्करसाठी या वर्षीचा भारतातर्फेची अधिकृत प्रवेशिका असलेला बहुचर्चीत मराठी चलचित्रपट ’हरिश्चंद्राची फॅक्टरी’ पाहण्याचा योग आला.
भारतिय चित्रपट सृष्टीचे जनक असणा‌र्‍या दादासाहेब फाळके यांच्या चित्रपट बनविण्याच्या प्रवास म्हणजे हा चित्रपट.

वर्ष १९११, इंग्रजांच्या राजवटीत केळफा (फाळके) इंग्लंडचा ख्रिस्तावरिल मुकपट पाहुन प्रभावित होतात आणि भारतात मुकपट उद्योग सुरु करायचा असा चंग बांधतात.
पण हे सगळे इतके सोपे नसते. प्रिंटींगप्रेसचा धंदा सोडलेल्या फाळक्यांच्या घरात पैसे नसतात, मात्र अजोड चिकाटी आणि महत्वकांक्षा असते. घरातील पै-नी-पै गोळा करुन आणि वर घरातील सामान विकुन ते या विषयीचा अभ्यास करतात आणि एक प्रोजेक्टर विकत घेतात (ज्यात फक्त फोटो पहायची सोय असते).

मुकपटाविषयी अधिक माहीती करुन घ्यावी यासाठी ते लंडनला जायचा बेत करतात व त्यासाठी कर्ज काढतात, वर बायकोचे दागीने गहाण टाकतात. लंडनला जाउन तिथे चित्रपटावर लिहिणा‍र्‍या मासिकाच्या ऑफिसात जाउन सरळ चित्रपट निर्मितीविषयी माहीती घेतात, आणि भारतात परत येवुन पहिल्या मुकपट बनविण्याच्या तयारित लागतात.

लंडनहुन कॅमेरा येतो, आणि मग कुठला मुकपट बनवावा यावर विचार सुरु होतो, मग ते राजा हरिश्चंद्रावर मुकपट बनविण्याचे ठरवितात, त्यानुसार कलाकारांसाठी शोध सुरु होतो, आणि अनेक अडथळ्यांसहीत चित्रपट पुर्ण होतो. पहिल्या एक-दोन दिवसात फारसा प्रतिसाद मिळत नाही, मग गल्लोगल्ली जाहीरात वगैरे करुन, आणि लकी ड्रॉ सारख्या योजना चालवुन अखेरीस मुकपट प्रचंड यशस्वी होतो. यानंतर फाळके अनेक धार्मिक चित्रपटांची निर्मीती करतात.

फाळकेंचा चित्रपट युरोपात सुद्धा प्रदर्शीत होतो, आणि इंग्रंजांकडुन प्रशंसा होते, तिथे चित्रपट बनविण्याचे त्यांना आमंत्रण मिळते पण फाळके ते सोडुन मायदेशात चित्रपट निर्मिती उद्योगाला चालना देण्यासाठी भारतात परत येउन चित्रपट निर्मिती चालु ठेवतात...

हा प्रवास चित्रपटात विनोदी अंगाने सादर केला आहे. तारामतीच्या भुमिकेसाठी स्त्री कलाकार शोधण्यासाठीचा शोध आणि प्रत्यक्ष मुकपटाच्या निर्मिती दरम्यानचे सिन तर झकास जमले आहेत. स्त्री पात्र साकारणार्‍या कलाकारांची मिशी कापण्यास केलेली टाळाटाळ, कारण केवळ बाप मेल्यावर मिशी काढतात असे समज...त्यावर दादासाहेबांचे स्पष्टीकरण वगैरे सिन्स अत्यंत मनोरंजक.

परेश मोकाशींचे दिग्दर्शन सुरेख आहे, तांत्रीक बाजु अगदी उत्तम आहेत. १९११-१९१५ चा काळ सुरेखपणे उभा केला गेला आहे, यासाठी नितिन देसाई यांच्या कलादिग्दर्शनाची मोलाची साथ मिळाली आहे. मला विशेष आवडलं ते सिनेमाचे पार्श्वसंगीत, आनंद मोडक आणि नरेंद्र भिडे यांचे खास अभिनंदन. प्रत्येक कलाकाराचा अभिनय उत्तम झाला आहे, फाळके झालेले नंदु माधव आणि त्यांच्या पत्नी असलेल्या विभावरी देशपाण्डे यांचे तर विशेष कौतुक. युटीवी सारख्या भक्कम निर्मिती संस्थेमुळे चित्रपटाचा स्टॅण्डर्ड अतिशय छान आहे...बघावाच असा...

14 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. एकदम झक्कास चित्रपट आहे हा.

    ReplyDelete
  3. पाहिला पाहिजे नक्की हा चित्रपट.....

    ReplyDelete
  4. छान आहे. प्रत्येकाने आवश्य पहावा. विभावरी देशपांडे लाजवाब.

    ReplyDelete
  5. आपली मराठीवर आलाय तेव्हां लागलीच पाहायला हवा....

    ReplyDelete
  6. @हेरंब,
    खरंच, एकदम झक्कासच, पहायलाच हवा...

    @तन्वी,
    जरुर पहा...नक्की आवडेल.

    @सुधीरजी,
    प्रतिक्रियेकरिता धन्यवाद! ब्लॉगवर स्वागत.

    @भाग्यश्री,
    जरुर पहा...तुम्हाला नक्की आवडेल...

    ReplyDelete
  7. मस्त आहे... पडद्यावर हालनारे चित्र पहायला नक्की जावे.... :)

    ReplyDelete
  8. पाहिला...फ़क्त मला त्यांना इंग्लंडमध्ये गेल्या गेल्या जास्त त्रास न होता (racisim etc...) तो चित्रपट बनवणारा भेटतो ते थोडं विचित्र वाटतंय...कदाचित ते तसंच झालं असेल किंवा चित्रपटाची लांबी वाढु नये यासाठी केलं गेलं असेल....

    ReplyDelete
  9. मी गेल्या आठवड्यातच पाहिला.विनोदी अंगाने मस्त हाताळला आहे विषय.तुम्हीही छान विश्लेषण केल आहे सिनेमाच.

    ReplyDelete
  10. @ नरेंद्र,
    प्रतिक्रियेकरिता धन्यवाद, ब्लॉगवर स्वागत!

    @ अपर्णा,
    तसं पाहीलं तर पुर्ण सिनेमा मध्ये त्यांनी चित्रपट निर्मिती सहजपणे केली असे वाटायची फार शक्यता आहे, पण त्याला डॉक्युमेंट्रीचे स्वरुप न देता विनोदी ठेवण्याच्या उद्देशाने परेश मोकाशींने हे बदल केले असावेत. असो चित्रपट प्रेक्षनिय आहे यात शंकाच नाही...

    @ देवेंद्र,
    मला अरे-तुरे चालेल, प्रतिक्रियेकरिता धन्यवाद, पण याला विश्लेष्ण म्हणतात का? त्यासाठी चित्रपटाचा अभ्यास पाहीजे, मी तर चित्रपट पाहुन मनाला येइल ते खरडतो... :)

    ReplyDelete
  11. एक धमाल चित्रपट म्हणून सुरेखच आहे. फाळके कुटुंबातील नातेसंबंधांची वीण किती घट्ट होती, हे सुंदर दाखवलं आहे. मात्र, देशातील पहिला चित्रपट बनवताना का होईना एका स्वप्नवेड्या व्यक्तीला पै न् पै जमा करताना किती अडचणींना तोंड द्यावं लागलं, हे जास्त प्रभावीपणे दाखवायला हवं होतं. दादासाहेबांनी स्वप्नपूर्तीसाठी आपल्या पत्नीचे दागिने व स्वत:ची विमा पॉलीसीही गहाण ठेवली, तेव्हा त्यांना आतून निश्चितच काहीतरी वाटलं असेल, ती वेदना थोडीफार समोर यायला हवी होती असं वाटतं. चित्रपट खेळकर बनविण्याच्या नादात थोडा विनोदी झाला आहे. शिवाय चित्रपट शेवटी आटोपता घेतल्यासारखा वाटला. निदान आताच्या पिढीला ह्या वेड्या माणसाने केवढा मोठा इतिहास घडवला, हे इतकं कॅज्युअली समजायला नको असं वाटतं. अर्थात हा माझं मत झालं.

    ReplyDelete
  12. @ कांचन,
    सहमत, पण मला ते सर्व पटलं.
    विनोदी असलं तरी त्यांची चित्रपट बनविण्याची तळमळ पुर्ण कळली.
    द्रुष्टी गेल्यानंतर देखील ते डॉक्टरला मुकपट बनविता येणार नाही का हेच विचारतात..
    त्यांचं चरित्र डॉक्युमेंट्री स्वरुपात जर दाखवलं गेलं असतं तरी आजच्या पिढीने कितपत त्याला प्रतिसाद दिला असता?
    चित्रपटाचा मुख्य उद्देश हा पहिला मुकपट बनविण्यापर्यंतच होता असे मला वाटले म्हणुन शेवट आटोपल्या सारखे नाही वाटले...
    काहीही असो एक चित्रपट म्हणुन नक्कीच लक्षवेधी आहे...

    ReplyDelete
  13. बरेच दिवसांत नविन पोस्ट नाही.

    ReplyDelete
  14. मीनल, अश्यात केवळ एकच सिनेमा पाहिला ’अप इन द एअर’ त्याबद्दल गणेश मतकरींनी आधिच लिहिले आहे, त्यामुळे काही नाही लिहिले. या सप्ताहांत एखादा चांगला सिनेमा मिळाला तर पहातो आणि लिहितो.

    प्रतिक्रियेकरिता धन्यवाद!

    ReplyDelete