Thursday 21 July 2011

स्टॅंडर (२००३)

दिग्दर्शक - ब्रॉन्वेन ह्युझ

"द रॉंग वन ऑलवेज डाईज"...साउथ आफ्रिकेच्या जोहानिसबर्गमध्ये एका दंगलीमध्ये एका स्थानिक झुलू माणसाला गोळी झाडून मारल्यावर पश्चातापाने म्हणणारा पोलीस कॅप्टन आंद्रे स्टॅंडर ह्या घटनेनंतर प्रचंड बदलतो.  आधी कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी असणारा आंद्रे त्या दंगलीनंतर मानसिकरित्या खचून जातो.  स्थानिक आफ्रिकन लोकांवर गोर्‍या लोकांमुळं खूप अन्याय होतोय आणि त्यात नाहक त्यांना जीवही गमवावा लागतोय याचा सल आंद्रेच्या मनात वाढत जातो.

याच गोर्‍या लोकांच्या जाचक कायद्याविरुद्ध आणि त्यांना धडा शिकवायच्या उद्देशाने आंद्रे पोलीस असूनही बॅंका लूटायचं सत्र सुरू करतो.  वेष बदलून बॅंक लूटायची आणि नंतर त्याच बॅंकेत इन्व्हिस्टीगेशन साठी जायचं असं करून तो बर्‍याच बॅंका लूटतो.  त्याच्या मनगटी घड्याळाला एका बॅंकेच्या कॅमेरात ओळखून त्याच्या पोलिस मित्र सापळा रचून आंद्रेला पकडतो.  आंद्रेला न्यायालयात उभं केलं जातं आणि त्याच्यावर चोरीचा आरोप ठेवण्यात येतो, त्यावेळी आंद्रे न्यायाधिशांना म्हणतो की माझ्यावर खूनाचा खटला दाखल करा कारण मी एका झुलू माणसाला मारलं आहे. पण अर्थात न्यायाधिश केवळ चोरीचा खटला चालवून त्याला तुरुंगात टाकतात.

खरा आंद्रे स्टॅंडर 
तुरुंगात असताना आंद्रेची ओळख ऍलन आणि ली शी होते.   त्यांच्या मदतीने तो तुरुंगातल्या इस्पितळातून पलायन करतो.  आपल्या मित्रांसोबत नंतर अनेक बॅंका यशस्वीपणे लूटतो, पण बायकोला दुरावतो आणि अपेक्षित शोकांताकडं वळतो.  हा संपुर्ण सिनेमा आंद्रेच्या मनाच्या घालमेलीवर आहे, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, नाईलाजाने झुलू माणसाचा खून, त्यांनंतर गोर्‍यांबद्दल, त्यांच्या काळ्यांवरच्या अत्याचाराची चीड, त्यातून पुढे बदल्याची भावना निर्माण होणे या एक एक टप्प्यावर आंद्रेची मानसिकता सिनेमात अचूकपणे दाखवली आहे.  "इफ यू आर अ व्हाईट गाय, देन यू कॅन गेट अवे विथ ऍनिथिंग" हे त्याचं दुखणं बनतं आणि तो वाईट मार्गाकडे वाटचाल करू लागतो.  दक्षिण आफ्रिकेचं वातावरण सिनेमात अस्सल वाटतं, आंद्रेची व्यक्तीरेखा टॉम जेन या अभिनेत्याने मन लावून उभी केली आहे.   सिनेमा आपल्यालाही अस्वस्थ करून सोडतो.

4 comments:

  1. पाहायला हवा. तू इतके निवडक सिनेमे शोधून शोधून सांगतो आहेस नं... यादीच केलीये मी आता. एक एक करत टिपतेय... :)

    ReplyDelete
  2. हेरंब, महेंद्रकाका अन तुझ्याइतके सिनेमे अजून पहायचेत.. :-) धन्स ताई

    ReplyDelete
  3. कैच्याकै पंत... अहो असे कित्येक चांगले सिनेमे आम्ही अजून बघितलेले नाहीत..

    मस्त लिहिलं आहेस.. लगेच डालो करतो..

    ReplyDelete
  4. मस्त रे.
    थोडक्यात पण नीट नेटक.
    पहावा म्हणतो आता. :)

    ReplyDelete