दिग्दर्शक - विजय लालवानी.
दिल चाहता है, लक्ष्य, डॉन, हनिमुन ट्रॅवल्स प्रा.लि., रॉक ऑन, आणि लक बाय चान्स असे जवळपास सुंदर सिनेमा देणार्या एक्सेल एंटरटेन्मेंटचा या वर्षीचा सिनेमा 'कार्तिक कॉलींग कार्तिक' त्याच्या प्रोमोजवरुन एक चांगला थ्रीलर असल्याची साक्ष देत होता. कुणाला एक फोन येतो, त्यात बोलणार्याचा आवाज अगदी तसाच असतो, त्याला आपली सगळी रहस्ये, गुप्त माहिती माहित असते, थोडक्यात आपल्याला आपणच कॉल करतोय ही सुंदर कल्पना आहे एका थ्रीलरपटाची.
'कार्तिक कॉलींग कार्तिक' मध्ये कार्तिक (फरहान अख्तर) अतिशय साधा, नाकासमोर चालणारा असतो. चांगुलपणामुळे जास्तीची कामे ओढुन घेणे, काम करूनही बॉसचा ओरडा खाणे, कुणी मित्र नसने, ऑफिसात काडीचीही किंमत नसने, घरमालकाने सतावणे अश्या असंख्य समस्यांनी ग्रस्त असतो. यातच त्याला एक नेहमी स्वप्न पडत असते ज्यात त्याचा त्रास देणारा भाऊ विहिरीत पडुन मरतो. या मृत्यु साठी कार्तिक स्वतःला दोषी समजत असतो. यासाठी तो मानसोपचार तज्ञाची मदत सुद्धा घेत असतो.
एकदा रात्रभर जागुन काम करुन देखील बॉस कार्तिकला फोनवर खुप सुनावतो, आणि त्याला नोकरीवरुन कमी करतो. रागाच्या भरात कार्तिक फोन तोडतो आणि राग शांत झाल्यावर नविन फोन बसवतो.
दुसर्या दिवशी सकाळी एका फोन कॉल मुळे त्याची झोपमोड होते, कॉल उचलल्यावर पलीकडुन कार्तिक म्हणजे त्याचा स्वतःचाच कॉल असल्याचे त्याला कळते. पहिल्याप्रथम त्याला हे सर्व खोटं; एक विनोद वाटतो. पण फोन करणारा अशी काही सिक्रेट्स सांगतो जी केवळ कार्तिकलाच माहित असतात. त्या कॉलरचा आवाज देखील कार्तिक सारखाच असतो.
तो कॉलर कार्तिकला त्याच्या सर्व पेचप्रसंगातुन सोडवितो. त्याला जशास तसे वागायला शिकवितो. त्याचं प्रेम मिळवुन देतो, पण त्याबरोबर एक अट देखिल ठेवतो, की हा कॉल त्याला येतो हे कुणाला सांगायचं नाही.
कार्तिक प्रेमापुढे झुकुन प्रेयसीला हे सगळं सांगतो आणि मग तो कॉलर कार्तिकलाच संपवायला निघतो.
हा कॉलर कोण? आणि पुढे कार्तिकचे काय होते हा सिनेमाचा उत्तरार्ध.
सिनेमा एक उत्तम थरारपट आहे. शेवटपर्यंत आपल्याला खिळवुन ठेवतो. सिनेमाच्या डार्क फ्रेम्स रहस्यात गुढतेची भर टाकतात. मात्र थरारपटाच्या उत्सुकतेत अनावश्यक गाणी (ऐकायला बरी असुन) आणि थोडं लांबविलेले प्रेमप्रकरण व्यत्यय आणते. पण सिनेमा तगतो तो फरहान अख्तरच्या अतिशय प्रामाणिक अभिनयावर. सरळ साधा कार्तिक त्याने उत्तम रंगविला आहे, घाबरणारा कार्तिक आणि नंतर आत्मविश्वासाने वागणारा कार्तिक त्यांने व्यवस्थित रंगविला आहे.
पण त्याचं हे ट्रांस्फोर्मेशन अगदी फिल्मी दाखविले गेले आहे. उदा. नोकरीवरुन काढल्यावर तो बॉसच्या केबिन मध्ये जातो, टेबलावरची क्लाईंट फाईलचे पहीले एक-दोन पानं वाचुन त्यात तब्बल १२ चुका आहेत हे काही सेकंदात सांगतो वगैरे. पण त्याकडे आपले जास्त लक्ष जात नाही. विजय लालवानींना सिनेमाचे श्रेय द्यायलाच हवे, पहिल्या सिनेमातच त्यांनी आपली छाप पाडली आहे. दिपिका पडुकोन, राम, बाकी सहकलाकार योग्य.
एकुणात हिन्दी मध्ये काहीतरी वेगळं पाहण्याची इच्छा असेल तर जरुर पाहाण्याजोगा.
