Sunday 5 September 2010

रनिंग स्केअर्ड (२००६)

http://www.imdb.com/title/tt0404390/

दिग्दर्शक - वेन क्रेमर

थ्रीलर्स आपल्याला आवडण्यासाठी ते शेवटापर्यंत आपल्याला खिळवून ठेवणारे असावेत, वेळोवेळी अनपेक्षीत वळणं आणि उत्तम धक्के असावेत, आणि शेवटी सगळ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळावी.  या थ्रीलर्सच्या सर्वसाधारण अपेक्षेमध्ये बरेच थ्रीलर शेवटाला मात खातात.  आधी कथानकात उत्तम गुंतागुंत तयार करतात, पटकथा शेवटापर्यंत अतिशय सुंदर पळते मग शेवटी दिग्दर्शक, पटकथाकार जेंव्हा गुंता सोडवायला घेतात त्यावेळी जास्त वेळ न घेता सोपे पण न पटणारे उपाय सहसा शोधले जातात.   'रनिंग स्केअर्ड' हा थ्रीलर सुद्धा इथेच अडकतो.  अतिशय उत्तम गतीत बराचवेळ राहतो आणि शेवटाला ढिसाळतो.

येथील नायक जो (अत्यंत उत्तम अदाकारीत पॉल वॉकर) एका गुन्हेगारांच्या टोळीत काम करत असतो, ड्रग डिलींगच्या वेळी तिथं काही बुरखाधारी येतात, त्यांना दुसरी टोळी समजून, दोन्ही गटात गोळीबार होतो आणि एक सोडून सर्व बुरखाधारी मरण पावतात,  जो आणि टोळीला लक्षात येतं की ती दुसरी टोळीची माणसं नसून ती भ्रष्ट पोलीस होती, या प्रसंगाने बावरलेला टोळी प्रमुख त्यात वापरलेल्या बंदूकींना नष्ट करण्यासाठी जो कडे देतो.

त्या शस्त्रांची विल्हेवाट लावण्याऐवजी जो ती शस्त्र आपल्या घराच्या बेसमेंटमधील एका खणीत ठेवतो, तसं करताना त्याचा मुलगा निक आणि त्याचा शेजारचा रशियन मित्र ओलेग पाहतात.  तिथुन ओलेग घरी परत जातो, त्याचे विक्षीप्त वडील त्याला त्रास देतात त्यातच ओलेग त्यांच्यावर गोळी झाडतो, ती चुकते व खांद्याला लागते, गोळीबाराचा आवाज ऐकून जो त्यांच्या घरी येतो व केलेल्या वर्णनावरून त्याला लक्षात येतं की ही बंदूक त्याचीच आहे आणि ती जर पोलिसांच्या हाती लागली तर तो आणि त्याची टोळी अडचणीत येणार.

मग जो चा ओलेग आणि पर्यायाने त्या बंदूकीचा शोध, त्यात ओलेग वेगवेगळ्या अडचणींमध्ये सापडतो आणि दरवेळी त्याचा पाठलाग करताना जो आणि त्याची बायको टेरेसा (व्हेरा फर्मिंगा) त्याची सुटका करता करता अनेक अडचणीत सापडतात.  या अडचणीतून ओलेग, जो आणि टेरेसा कसा मार्ग काढतात ही पुढील कथा.

सुरुवातीपासून ते शेवटच्या वीस मिनिंटापुर्वी पर्यंत सिनेमा आपल्याला अगदी सिटच्या एजवर ठेवतो, अतिशय उत्कंठावर्धक सिक्वेंसेस आहेत,  दरवेळी ओलेग नविन अडचणीत येतो आणि बंदूक बर्‍याच लोकांच्या हातातून जाते, त्यासर्वांना शोधताना जो ची कसोटी लागते.  पुर्णवेळ फॉर्मात असणारा हा सिनेमा शेवटाला मात्र गुंते सोडवताना मात्र पार कोलमडतो.

पॉल वॉकर (जो), व्हेरा फर्मिंगा (टेरेसा), कॅमेरॉन ब्राईट(ओलेग) आणि कारेल रॉडेन (ओलेगचे सावत्र वडील) यांचा अभिनय उत्तम आहे.  लेखक आणि दिग्दर्शक वेन क्रेमरचं दिग्दर्शन उत्तम आहे, केवळ शेवटाचा काही भाग वगळता, यात दिग्दर्शकापेक्षा लेखक कमी पडला आहे.  सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे, एका घरातून दुसर्‍या घरात काचातून कॅमेरा आत नेण्याची पद्धत छान वाटली आहे.

शेवटचा काही भाग वगळता अतिशय उत्तम थरारपट.

17 comments:

  1. arrr... चित्रपट बघावा की नाही???

    ReplyDelete
  2. ओह्ह...होते खरे असे कधी की थ्रिलर सिनेमांचे. तरीही एकदा नक्कीच पाहायला हरकत नाही. परिक्षण नेहमीप्रमाणे छान.

    ReplyDelete
  3. हल्ली दोन तीन महिने सिनेमा आणि सिनेमाघर यापासून दूरच आहे, नवीन तसे छान सिनेमे येत नसल्याने.
    आता तुझ्या ब्लॉग चे सगळे मुवीज डाउनलोडिंगला ठेवतो..जरा मूड आलाय ;)
    मस्त लिहलयस...

    ReplyDelete
  4. सिनेमा कोलमडतो हे चालायचंच भाऊ!
    पण महिन्याला एक पोस्ट हे नाय चालायचं!

    ReplyDelete
  5. सौरभ, शेवटील १५-२० मिनिटं सोडून मला तरी भावला, तरी check on your own risk ;)

    ReplyDelete
  6. श्रीताई नक्कीच, एकदा पहायला काहीच हरकत नाही. प्रोत्साहनाबद्द्ल शतशः आभारी.

    ReplyDelete
  7. वा सुहास,तुझा मूड असाच टिको, तुला काही नविन चांगल्या सिनेमांची खबर लागली तर मलाही कळव... प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  8. विद्याधरा, या दोन महिन्यात सिनेमा सुद्धा खुप कमी पाहीले.....
    हेरंबच्या मित्रांसोबत खुप वेळ गेला... ;)

    ReplyDelete
  9. हम्म.. खरंय.. शेवट जमला नाही तर सगळाच मूड जातो.. पण तरीही तू एवढं कौतुक केलं असल्याने लगेच डालो केला आहे. कधी बघणं होईल हे मात्र विचारू नकोस :(

    रच्याक, मित्रांची किती 'वर्षं' सरली?

    ReplyDelete
  10. एकच संग पाहू का नको?

    ReplyDelete
  11. What is your verdict,Watchable or Ordinary?

    ReplyDelete
  12. हेरंब, मित्रांची ६ वर्ष संपली रे ... ;) आरामात बघ आणि कळव.


    सागर, अनिकेत पाहण्यासारखा आहेच. प्रतिक्रियांकरीता धन्यवाद.

    ReplyDelete
  13. wow sahi aahe ha blog!!! ह्या प्रतिक्रिया अजिंक्य च्या आहेत. वय वर्ष १४ असल्याने आम्ही असेच चित्रपट पाहतो. मला विशेष आवड नव्हती पण आत्ता लेकाच्या नादाने मी पण आवर्जून पाहते. छान असतात, कथानकाला वेग असतो आणि तंत्रद्यान अप्रतिम असते. छान लिहिलेस.

    ReplyDelete
  14. खुप खुप धन्यवाद अनुजाताई आणि स्पेशली अजिंक्य.... ब्लॉगवर स्वागत

    ReplyDelete
  15. बर्‍याच थ्रिलर सिनेमांना हा शाप असतो. सुरूवात चांगली तर शेवट टुकार आणि सुरूवात रटाळ होते पण शेवट दणकेबाज होतो. थ्रिलर सिनेमात थ्रिल कायम टिकवून ठेवणं ही देखील एक कल आहे असंच म्हटलं पाहिजे.

    ReplyDelete
  16. खरंय.. सुरुवात रटाळ असेल पण शेवट सुखावणारा असेल तर शेवटी फसगतीची भावना नाही राहत, पण सुरुवात सुंदर करून अपेक्षा वाढवून तोंडावर पाडलेलं जास्त लक्षात राहतं ;)

    ReplyDelete
  17. हे बरोबर बोललास. त्यामुळे सिनेमाची वाईट माऊथ पब्लिसिटी जास्त होते.

    ReplyDelete