पडद्यावर सर्वत्र अंधार.. थोड्या वेळात कण्हनं अन लाकडी फळीवर थापांचा आवाज येतो... काहीएक अंदाज लागत नसताना एका लायटरच्या प्रकाशात एक व्यक्ती दिसते... जखमी अवस्थेत.. त्या व्यक्तीलाही थोड्याच वेळात धक्का बसतो.. कारण तो एका शवपेटीत बंद असतो.. हात आणि तोंड बांधलेल्या अवस्थेत.रॉड्रिगो कॉर्ट्सच्या 'बरीड' सिनेमाची ही सुरुवात.. यातला 'तो' (अन एकमेव पात्र) असतो पॉल कॉनरॉय, शवपेटीत बंद असल्याचे कळताच तो मदतीसाठी पुकारतो अन जोरजोरात शवपेटीचं झाकण उघडायचा अयशस्वी प्रयत्न करतो. थोड्यावेळाने एक फोन त्याच्या पायाशी व्हायब्रेट होतो, पण पायाच्या सहाय्याने तो घेईपर्यंत कट होतो, फोन तर असतो पण त्यातली भाषा अरेबीक/इराकी असते. तरीही प्रयत्न करून, पॉल मदतीसाठी आधी ९११, नंतर FBI, कंपनी हेड्क्वार्टर, स्टेट डिपार्टमेंट सगळी कडं फोन करतो, शेवटी इराकमधील होस्टेज रेस्क्यू ग्रुप मधील डॅन त्याला मदत करायचं फोनवर आश्वासन देतो. फोन संभाषणाद्वारे आपल्याला कळतं की पॉल हा इराक मध्ये अमेरिकन कंपनीत ड्रायव्हर होता, आणि त्यांच्या ट्रक्स वर आधी हल्ला झाला अन त्यानंतर त्याला काही आठवत नाही.
तेवढ्यात पॉलला एक फोन येतो, त्यावर एक अरेबिक ऍसेंट मध्ये बोलणारा इसम पॉलच्या सोडवणुकीसाठी पाच मिलियन डॉलरची मागणी करतो. इकडं पॉलची कंपनी त्याला मदत करण्याऐवजी त्याला सकाळीच बडतर्फ केल्याचं सांगते, अन मदतीसाठी साफ नकार देते. एक फोन, थोडं पाणी, आणि लायटर इतक्याच गोष्टी पॉलजवळ असतात. त्यात त्याला किडनॅपर परत फोन करतो अन पैसे मिळवण्यासाठी आपलं बोट काप आणि त्याचा व्हिडीओ अपलोड कर म्हणतं, त्यासाठी एक चाकू, बॅटरी, अन लाईट ट्युब ठेवलेली एक पिशवी पायथ्याशी आहे असं सांगतो.
जीवघेण्या प्रसंगातून सुरू होते मग पॉलची वाचण्याची तडफड.
पॉलचे सुटकेचे प्रयत्न पाहताना डॅनी बॉयलचा १२७ अवर्स आठवतो. त्यातही आधी सुटकेची आशा, प्रचंड प्रयत्न, खूप प्रयत्नानंतर आलेलं अपयश, मग त्या वातावरणाशी सरावणं, अजुन लॉजिकल प्रयत्न करणं, मृत्यु जवळ आहे या जाणिवेणं घर, कुटुंब आठवणं हे सर्व घटक सारखे आहेत. पण सिनेमात आपण पुर्णवेळ एकच माणूस पाहतो, तो ही एका शवपेटीत, बाकी सर्व फोनवरचे आवाज. पॉलच्या आठवणीही फ्लॅशबॅक मध्ये नाहीत, त्याही केवळ फोनद्वारे आपल्याला कळतात. एका पात्रात, अन एका शवपेटीत असूनही पुर्ण सिनेमाभर (९० मिनिटं) आपण खिळून राहतो, दिग्दर्शक अन पटकथेला दाद द्यायलाच हवी. लायटरच्या अपुर्या प्रकाशात, फोनच्या प्रकाशात, उजेडाचे अन अंधाराचे प्रयोग करून आपल्याला दिग्दर्शक एकदम त्या जागी पोचवतो. शेवटही धक्कादायक. स्ट्रॉन्ग्ली रिकमेंडेड.







