Monday, 8 August 2011

४०४ (२०११)

दिग्दर्शक - प्रवाल रमन

http://www.imdb.com/title/tt1883121/

राम  गोपाल वर्माच्या 'फॅक्टरी'तून बर्‍याच काही चांगल्या गोष्टी बाहेर आल्यात, आणि अर्थात वाईटही.  चांगल्या गोष्टींमध्ये काही उत्तम दिग्दर्शक भेटत आहेत ज्यांनी आधी वर्माच्या हाताखाली सहायक दिग्दर्शन केलं होतं.  जॉनी गद्दार वाला श्रीराम राघवन तसेच प्रवाल रमन.  प्रवाल रमनचे 'फॅक्टरी' बॅनरचे सिनेमा यथातथाच होते उ.दा. डरना मना है, डरना जरूरी है, गायब वगैरे.  पण त्यातही कंसेप्च्युअल लेव्हलवर बर्‍यापैकी प्रयोग होते.  डरना मना है अन जरूरी मध्ये एका कथेऐवजी सहा कथा, गायब मध्ये गायब होणार्‍या पण मिस्टर इंडिया किंवा तत्सम सुपरहिरो ऐवजी सामान्य स्वप्नाच्या माणसाची कथा असा थोडा वेगळा प्रकार होता.

बॅनर बाहेरचा पहिलाच '४०४' हा सिनेमा मात्र त्याच्या पुर्वीच्या सर्व सिनेमांहून खूप सरस आहे.  सिनेमाचं सार पहायला गेलं तर तसं एका भयपटाला साजेसं आहे, पण त्यातही मनोवैज्ञानिक आणि मानसिक गुंतागुंत तयार करून उत्तम पटकथेसह आणि नव्या पण उत्तम दर्जाच्या अभिनेत्यांसह प्रवाल रमनने एक सुखद धक्का दिला आहे.  परत एकदा मोठी स्टारकास्ट, भरमसाठ बजेट, भव्यदिव्य सेट्स, लोकेशन्स नसतानाही उत्तम सिनेनिर्मिती होऊ शकते हे सिद्ध होतं.

'४०४' कथा आहे, एका वैद्यकीय महाविद्यालयाची, ज्यात नवी बॅच येते, सालबादाप्रमाणे इथेही सिनियर ज्युनियर्सची रॅगिंग घेतात, त्यात एक मुलगा अभिमन्यु (राजविर अरोरा) सिनियरच्या दबावाला न जुमानता त्यांच्याविरुद्ध तक्रार करतो, आणि त्यांचा रोष ओढवून घेतो.  त्यांच्या हॉस्टेल मध्ये रूम नं ४०४ मध्ये २-३ वर्षांपुर्वी एका मुलाने आत्महत्या केली असते, तेंव्हापासून ती रूम कुलूपबंद ठेवलेली असते, अभिमन्यु हा भुत-प्रेत हे मानत नाही आणि तो त्या रूम मध्ये राहण्याचा आग्रह करतो, त्याला पाठींबा देतात ते प्रोफेसर अनिरुद्ध (निशिकांत कामत),  अनिरुद्ध हे जगप्रसिद्ध वैज्ञानिक असून त्यांची अनेक पुस्तके तसेच प्रबंध असतात. 

निशिकांत कामत
त्या रूममध्ये गेल्यावर मात्र अभिमन्युला भूताटकी जाणवू लागते आणि त्याला मानसिकरित्या सिनियरही खतपाणी घालतात, मात्र प्रोफेसर अनिरुद्ध त्याला पाठींबा देतात आणि त्याला यातनं बाहेर काढण्याची पुर्ण हमी देतात.  मग हा भूताटकी प्रकार खरा का खोटा?, मानसिक किती अन खरं किती? जे दिसतं ते खरंच असतं का?  असे अनेक प्रश्न, उपप्रश्न पडत जातात.   प्रोफेसर आणि अभिमन्युच्या चर्चेतून बरंचसं जड मनोवैज्ञानिक आपण ऐकतो आणि त्या पात्रांच्या मानसिकतेत गुरफटत जातो. शेवटाला तर अनेक धक्के अन परमोच्च शेवट होतो आणि आपल्याला एक उत्तम सिनेमा पाहिल्याचा अनुभव मिळतो.

सिनेमा सर्व बाबतीत उजवा आहे, दिग्दर्शन, कथा, पटकथा, अभिनय, नवोदित असूनही अभिमन्युच्या भुमिकेत राजविर अरोराने उत्तम काम केलंय, त्याला तगडी (आणि आश्चर्यकारक) साथ आहे ती प्रोफेसरच्या भुमिकेतल्या दिग्दर्शक निशिकांत कामतांची(डोंबिवली फास्ट आणि मुंबई मेरी जानचे दिग्दर्शक), सिनियर इमाद (नसिरूद्दिन शाह चा मुलगा), आणि टिस्का चोप्रा सर्व उत्तम.  घ्यायलाच हवा असा वेगळा अनुभव...



Friday, 22 July 2011

ट्रस्ट (२०१०)

दिग्दर्शक - डेव्हिड श्विमर

फ्रेण्ड्स या जगप्रसिद्ध सिटकॉम मधील 'रॉस गेलर'-डेव्हिड श्विमर त्याच्या उत्तम अभिनयासाठी माझा खास आवडता आहे, त्यानंतर त्याचा 'बिग नथिंग' हा उत्तम न्वारपट पाहण्यात आला आणि त्याच्या चतुरस्त्र अभिनयाची खात्री पटली.   'ट्रस्ट' सिनेमा मिळाला तेंव्हा केवळ डेव्हिड श्विमर दिग्दर्शक आहे म्हणून हा सिनेमा पाहायला घेतला, त्याबद्दल काही वाचलेलेही नव्हते, पण सिनेमा पाहून त्याच्या दिग्दर्शन आणि संवेदनशिल मनाचीही पावती मिळाली.

डेव्हिड श्विमर हा गेली दहा वर्ष Rape Foundation मध्ये एक बोर्ड मेंबर आहे, तिथे असताना त्याला पहाव्या लागलेल्या काही दुर्दैवी मुलींची आणि त्यांच्या पालकांची अवस्था त्याला हा सिनेमा बनवण्यास उद्युक्त करून गेली, जेणेकरून अल्पवयीन मुलींवर अत्याचार होऊ नयेत.

 सिनेमा आहे ऍनी या टीन एज मधल्या मुलीबद्दल.  आजच्या पिढीची ऍनी सतत फोनवर असते, तिच्या चौदाव्या वाढदिवसाला तिचे वडिल विल कॅमेरॉन तिला एक लॅपटॉप भेट देतात.  मग इंटरनेटवर ऍनीला चार्ली नावाचा मुलगा भेटतो, आधी तो तिला १६ वर्षाचा असल्याचं सांगतो आणि मग नंतर २०चा आहे असं सांगतो, पण तिचा विश्वास संपादन करतो आणि त्याला स्वतःचा मित्र आणि नंतर प्रियकर मानू लागते. त्याने वय लपवलं हे तिच्या पालकांना सांगत नाही.

एक दिवस चार्ली तिला भेटण्याबद्दल म्हणतो आणि ते दोघे भेटतात, पण चार्ली हा २० वर्षाचा नसून ३०-३५शीचा असतो, तरीही तो तिला त्याच्याबद्दल कन्व्हिंस करतो आणि त्यादिवशी तिच्या संमतीने तिच्यासोबत सेक्स  करतो आणि त्याची शुटींगही घेतो.  चार्लीच्या मैत्रीणीला ही गोष्ट कळाल्यावर ती पोलिसांना कळवते आणि मग सुरू होतो चार्लीला पकडण्याचा प्रयत्न. 

सिनेमा चार्लीला पकडण्यावर नसून त्याचा मुख्य उद्देश पीडित कुटूंबातील व्यक्तीरेखांवर आहे.  ऍनी टीनेजर प्रमाणेच आपल्याच जगात वावरणारी असते, सर्व गोष्टींमध्ये उत्साही, सळसळणारी,  आणि जगात काहीच वाईट नाही असा विश्वास असणारी,  त्या घट्नेनंतर तिच्या मनात प्रचंड अविश्वास निर्माण होतो, आधी मैत्रीणीबद्दल, मग वडिलांबद्दल, त्यानंतर पुर्ण कुटूंबाबद्दल.

तिचे आई-वडिल दोघेही अत्यंत मोठ्यामनाचे असतात, आणि आपल्या मुलांबरोबर त्यांचे मित्रत्वाचे संबंध असतात.  आई अतिशय काळजीवाहू असते, आणि त्या घटनेमुळे मुलीसाठी तिचा जीव तुटतो.  सर्वात त्रास होतो तो तिच्या वडिलांना (क्लाईव ओवेन), आधी हसतमुख, कुटूंबवत्सल असलेले नंतर हतबल, चिंतातूर, सुडाच्या भावनाने पेटलेले तर मुलीबाबतीत तितकेच हळवे होतात, त्यातच मुलगी त्यांच्यावर विश्वास ठेवत नसल्यामुळे आणि तिने लपवल्या मुळे दुखावले गेलेले असतात.  क्लाईव ओवेनने सर्व छटा त्याच्या समर्थ अभिनयातून सक्षमपणे दाखवल्या आहेत.


श्विमरचा हा सिनेमा अभिनय आणि पटकथेत पैकीच्या पैकी गुण मिळवतो.  ऍनी (लियाना लिब्रॅटो), आणि क्लाईव ओवेन यांनी भुमिकेत जीव ओतलाय.  बापाची हतबलता, राग, आणि दुःख तसेच ऍनीचा आधीचा विश्वास आणि नंतर सत्य कळल्यावर कोलमडणं आपल्याला प्रसंगानुसार हताश, दुःखी बनवतं, हेच सिनेमाचं यश.  हॅलोविन डिनर आणि शेवटचा स्विमिंग पूल जवळ ऍनी आणि विलचा हृदयद्रावक प्रसंग हे सर्वोच्च.

डेव्हिड श्विमरच्या पुढल्या दिग्दर्शिय भुमिकेची मी आता अतुरतेने वाट पाहीन..  please do yourself a favor and watch "TRUST".

श्विमर आणि सिनेमातल्या कलाकारांचा सिनेमाबद्दलचा व्हिडीओ इथं पहाता येईल.

http://www.imdb.com/video/imdb/vi501652761/

Thursday, 21 July 2011

स्टॅंडर (२००३)

दिग्दर्शक - ब्रॉन्वेन ह्युझ

"द रॉंग वन ऑलवेज डाईज"...साउथ आफ्रिकेच्या जोहानिसबर्गमध्ये एका दंगलीमध्ये एका स्थानिक झुलू माणसाला गोळी झाडून मारल्यावर पश्चातापाने म्हणणारा पोलीस कॅप्टन आंद्रे स्टॅंडर ह्या घटनेनंतर प्रचंड बदलतो.  आधी कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी असणारा आंद्रे त्या दंगलीनंतर मानसिकरित्या खचून जातो.  स्थानिक आफ्रिकन लोकांवर गोर्‍या लोकांमुळं खूप अन्याय होतोय आणि त्यात नाहक त्यांना जीवही गमवावा लागतोय याचा सल आंद्रेच्या मनात वाढत जातो.

याच गोर्‍या लोकांच्या जाचक कायद्याविरुद्ध आणि त्यांना धडा शिकवायच्या उद्देशाने आंद्रे पोलीस असूनही बॅंका लूटायचं सत्र सुरू करतो.  वेष बदलून बॅंक लूटायची आणि नंतर त्याच बॅंकेत इन्व्हिस्टीगेशन साठी जायचं असं करून तो बर्‍याच बॅंका लूटतो.  त्याच्या मनगटी घड्याळाला एका बॅंकेच्या कॅमेरात ओळखून त्याच्या पोलिस मित्र सापळा रचून आंद्रेला पकडतो.  आंद्रेला न्यायालयात उभं केलं जातं आणि त्याच्यावर चोरीचा आरोप ठेवण्यात येतो, त्यावेळी आंद्रे न्यायाधिशांना म्हणतो की माझ्यावर खूनाचा खटला दाखल करा कारण मी एका झुलू माणसाला मारलं आहे. पण अर्थात न्यायाधिश केवळ चोरीचा खटला चालवून त्याला तुरुंगात टाकतात.

खरा आंद्रे स्टॅंडर 
तुरुंगात असताना आंद्रेची ओळख ऍलन आणि ली शी होते.   त्यांच्या मदतीने तो तुरुंगातल्या इस्पितळातून पलायन करतो.  आपल्या मित्रांसोबत नंतर अनेक बॅंका यशस्वीपणे लूटतो, पण बायकोला दुरावतो आणि अपेक्षित शोकांताकडं वळतो.  हा संपुर्ण सिनेमा आंद्रेच्या मनाच्या घालमेलीवर आहे, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, नाईलाजाने झुलू माणसाचा खून, त्यांनंतर गोर्‍यांबद्दल, त्यांच्या काळ्यांवरच्या अत्याचाराची चीड, त्यातून पुढे बदल्याची भावना निर्माण होणे या एक एक टप्प्यावर आंद्रेची मानसिकता सिनेमात अचूकपणे दाखवली आहे.  "इफ यू आर अ व्हाईट गाय, देन यू कॅन गेट अवे विथ ऍनिथिंग" हे त्याचं दुखणं बनतं आणि तो वाईट मार्गाकडे वाटचाल करू लागतो.  दक्षिण आफ्रिकेचं वातावरण सिनेमात अस्सल वाटतं, आंद्रेची व्यक्तीरेखा टॉम जेन या अभिनेत्याने मन लावून उभी केली आहे.   सिनेमा आपल्यालाही अस्वस्थ करून सोडतो.

Sunday, 10 July 2011

द मॅटाडोर (२००५)

दिग्दर्शक - रिचर्ड शेफर्ड


दोन भिन्न प्रवृत्तीची माणसं, एक हिटमॅन..ज्युलियन नोबल( पिअर्स ब्रॉसनन) बेफिकरी वृत्तीचा.. घर.. बायको, मुलंबाळं नसणारा.. आयुष्यात नेहमी मौजमजा करणारा.. दुसरा डॅनी राईट (ग्रेग किन्नर) स्वभावाने शांत.. अगदी घरघुती.. नाकासमोर चालणारा.   योगायोगाने दोघांचीही भेट मेक्सिकोच्या एका बारमध्ये होते.  डॅनी नौकरीतील अपयशाने खचलेला असतो आणि एका मोठ्या कॉन्ट्रॅक्टसाठी क्लायंट भेटीवर मेक्सिकोला आलेला असतो, तर ज्युलियन त्याच्या कामानिमित्त (असासिनेशन) तिथे आलेला असतो.  


सुरुवातीच्या अडखळ्यानंतर दोघं सोबत फिरू लागतात आणि त्यांच्यातली मैत्री वाढू लागते.  ज्युलियन हिटमॅन आहे हे डॅनीला पटत नाही पण मेक्सिकन बुल फाईटच्या सामन्यात ज्युलियन त्याला एक कट रचून दाखवतो,  डॅनी घाबरतो पण ज्युलियन तो कट पुर्णत्वास नेत नाही.   नंतर बोलताना ज्युलियन डॅनीला त्याच्या कामात मदत करण्यासाठी सांगतो, कारण अश्यात त्याच्या कामात चुका होऊ लागत असतात.  डॅनी एकदम घाबरतो आणि ज्युलियनला परत भेटत नाही.

चार वर्षानंतर डॅनीच्या घरी ख्रिसमसच्या वेळी अचानक ज्युलियन आगंतुकपणे येतो, त्याच्याशी त्याच्या बायकोशी आपुलकीने बोलून मर्जी संपादन करतो आणि परत एकदा डॅनीला त्याच्या कामात शेवटची मदत करण्यास सांगतो, आणि हे काम फत्ते झाल्यावर त्याच्या जीवाचा धोका पुर्ण नाहीसा होईल असं सांगतो.  डॅनी परत नकार देताच तो त्याला म्हणतो की डॅनी वर त्याचं एक ऋण आहे आणि ते परत करण्याचा हा एकमेव मार्ग आहे. ते ऋण कोणतं आणि डॅनी त्याला मदत करतो का? हे चित्रपटात पाहणं मजेचं आहे.


ज्युलियनच्या भुमिकेत पिअर्स ब्रॉसनन अगदी भन्नाट आहे, डॅनी रंगवलेला ग्रेग किन्नर त्याच्या नेहमीच्याच टेलरमेड भुमिकेत आहे, पण सगळा सिनेमा पिअर्स ब्रॉसननने खाऊन टाकला आहे.  त्याला कॉमिक रोल मध्ये पहिल्यांदाच पाहिलंय आणि तो खूप आवडून जातो.  शेवटाच्या अर्ध्या तासात सिनेमा अत्त्युच्च पातळी गाठतो अन कथानक भरपूर वळणं घेतं.    पिअर्स ब्रॉसननच्या शानदार भुमिकेसाठी नक्की पाहावा असा...

Saturday, 9 July 2011

बरीड (२०१०)

दिग्दर्शक - रॉड्रिगो कॉर्ट्स

पडद्यावर सर्वत्र अंधार.. थोड्या वेळात कण्हनं अन लाकडी फळीवर थापांचा आवाज येतो... काहीएक अंदाज लागत नसताना एका लायटरच्या प्रकाशात एक व्यक्ती दिसते... जखमी अवस्थेत.. त्या व्यक्तीलाही थोड्याच वेळात धक्का बसतो.. कारण तो एका शवपेटीत बंद असतो.. हात आणि तोंड बांधलेल्या अवस्थेत.

रॉड्रिगो कॉर्ट्सच्या 'बरीड' सिनेमाची ही सुरुवात.. यातला 'तो' (अन एकमेव पात्र) असतो पॉल कॉनरॉय,  शवपेटीत बंद असल्याचे कळताच तो मदतीसाठी पुकारतो अन जोरजोरात शवपेटीचं झाकण उघडायचा अयशस्वी प्रयत्न करतो.   थोड्यावेळाने एक फोन त्याच्या पायाशी व्हायब्रेट होतो, पण पायाच्या सहाय्याने तो घेईपर्यंत कट होतो, फोन तर असतो पण त्यातली भाषा अरेबीक/इराकी असते.  तरीही प्रयत्न करून, पॉल मदतीसाठी आधी ९११, नंतर FBI, कंपनी हेड्क्वार्टर, स्टेट डिपार्टमेंट सगळी कडं फोन करतो, शेवटी इराकमधील होस्टेज रेस्क्यू ग्रुप मधील डॅन त्याला मदत करायचं फोनवर आश्वासन देतो.  फोन संभाषणाद्वारे आपल्याला कळतं की पॉल हा इराक मध्ये अमेरिकन कंपनीत ड्रायव्हर होता, आणि त्यांच्या ट्रक्स वर आधी हल्ला झाला अन त्यानंतर त्याला काही आठवत नाही.

तेवढ्यात पॉलला एक फोन येतो, त्यावर एक अरेबिक ऍसेंट मध्ये बोलणारा इसम पॉलच्या सोडवणुकीसाठी पाच मिलियन डॉलरची मागणी करतो.  इकडं पॉलची कंपनी त्याला मदत करण्याऐवजी त्याला सकाळीच बडतर्फ केल्याचं सांगते, अन मदतीसाठी साफ नकार देते.    एक फोन, थोडं पाणी, आणि लायटर इतक्याच गोष्टी पॉलजवळ असतात.  त्यात त्याला किडनॅपर परत फोन करतो अन पैसे मिळवण्यासाठी आपलं बोट काप आणि त्याचा व्हिडीओ अपलोड कर म्हणतं, त्यासाठी एक चाकू, बॅटरी, अन लाईट ट्युब ठेवलेली एक पिशवी पायथ्याशी आहे असं सांगतो.
जीवघेण्या प्रसंगातून सुरू होते मग पॉलची वाचण्याची तडफड.

पॉलचे  सुटकेचे प्रयत्न पाहताना डॅनी बॉयलचा १२७ अवर्स आठवतो.   त्यातही आधी सुटकेची आशा, प्रचंड प्रयत्न, खूप प्रयत्नानंतर आलेलं अपयश, मग त्या वातावरणाशी सरावणं, अजुन लॉजिकल प्रयत्न करणं, मृत्यु जवळ आहे या जाणिवेणं घर, कुटुंब आठवणं हे सर्व घटक सारखे आहेत.  पण सिनेमात आपण पुर्णवेळ एकच माणूस पाहतो, तो ही एका शवपेटीत, बाकी सर्व फोनवरचे आवाज.  पॉलच्या आठवणीही फ्लॅशबॅक मध्ये नाहीत, त्याही केवळ फोनद्वारे आपल्याला कळतात.   एका पात्रात, अन एका शवपेटीत असूनही पुर्ण सिनेमाभर (९० मिनिटं) आपण खिळून राहतो, दिग्दर्शक अन पटकथेला दाद द्यायलाच हवी.  लायटरच्या अपुर्‍या प्रकाशात, फोनच्या प्रकाशात, उजेडाचे अन अंधाराचे प्रयोग करून आपल्याला दिग्दर्शक एकदम त्या जागी पोचवतो. शेवटही धक्कादायक.   स्ट्रॉन्ग्ली रिकमेंडेड.

Monday, 27 June 2011

शोर इन द सिटी (२०११)

दिग्दर्शक - राज निदीमोरू, कृष्णा डी.के.

ग्रे शेड वाली मध्यवर्ती पात्रं, प्रत्येकाची वेगवेगळी कहानी पण कुठेतरी एकमेंकात गुंतलेली आणि शेवट त्या मध्यवर्ती धाग्यांनी जोडून पात्रांना एका विशिष्ट दिशेने बदलणारा... वाचायला सोपी पण पटकथेत विणायला अवघड अशी ही कल्पना राज आणि कृष्णा या दिग्दर्शक द्वयींनी पडद्यावर शोर इन द सिटी सिनेमात खूप प्रभावीपणे मांडली आहे.

निम्न स्तरातील त्रिकूट तिलक (तुषार कपूर), रमेश (निखिल द्विवेदी) आणि मंडूक (पितोबश त्रिपाठी) हे छोट्या मोठ्या चोर्‍या करणारे, त्यात तिलकचा पुस्तक पायरसीचा धंदा असतो, पण त्यातही तो प्रामाणिक असतो.  एका लेखकाची अप्रकाशीत पुस्तकाची कॉपी चोरून त्याची कॉपी करतो.  मंडूक रेल्वेत चोरी करतो आणि त्यात त्याला शस्त्राने आणि बॉम्बने भरलेली बॅग मिळते, ती विकण्यासाठी मग त्यांना अंडरवर्ल्डशी संबंध जोडावा लागतो.

मध्यवर्गीय तरूण क्रिकेटपटू सावन (संदीप किशन) राष्ट्रीय टीममध्ये खेळण्यास उत्सुक असतो पण तिथल्या भ्रष्टाचारामुळे १० लाख भरल्याशिवाय त्याला खेळता येत नाही, आणि घरची परिस्थीती बेताची असल्याने ते जमत नाही त्यात त्याच्या प्रेमिकेचा लग्नासाठी दबावामुळेही तो अस्वस्थ असतो आणि घराच्या समोरच्या बॅंकला लूटायचा तो मनोमन प्लॅन बनवायला सुरूवात करतो.

उच्चवर्गिय अनिवासी भारतीय अभय (सेंथिल राममुर्ती) विदेशातून भारतात धंदा (बिझनेस, धंदा म्हणजे एकदम डाऊन मार्केट वाटतं म्हणून) करायला येतो पण स्थानीक गुंडांच्या (झाकीर हुसेन) त्रासाला कंटाळलेला असतो, या तिन्ही गोष्टींचं एकत्र येण हे गणेश विसर्जनाच्या दिवशी कसं एकत्र येतं आणि त्यांच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळते हे या डार्क कॉमेडी सिनेमात खूप चांगलं दाखवलं आहे.

राज आणि कृष्णा यांच्या पहिल्या '९९' सिनेमात त्यांनी दिल्ली शहराला पार्श्वभुमी घेऊन क्रिकेट बेटींगवर आधारीत अप्रतिम डार्क कॉमेडी सादर केली होती. खरी पात्रं आणि त्यांचं काहीस ग्रे असणं हा त्यांच्या सिनेमांचा खास पैलू आहे.  त्यांच्या कडून अजुन चांगल्या सिनेमांची अपेक्षा करणं ओघानं आलंच.

Sunday, 26 June 2011

रागिनी एमएमएस ( २०११ )

दिग्दर्शक - पवन क्रिपलानी

२००७ सालच्या 'पॅरानॉर्मल ऍक्टीव्हिटी' मुळे किंबहुना त्याच्या यशामुळे थरारक चित्रपटांचा एक नवा पायंडा पडला.  अर्थात यात १९९९ सालच्या 'द ब्लेअर विच प्रोजेक्ट'चाही वाटा आहे.  हॅंडहेल्ड कॅमेरा आणि शॉर्ट सर्कीट कॅमेरा यातून हे सिनेमे घडवले जातात आणि कॅमेरा हा सिनेमाचा एक भाग म्हणून असतो ही संकल्पना.  याआधी भारतात बालाजी टेलिफिल्म्सच्याच 'लव, सेक्स और धोका' या सिनेमातून थरारक घटक वगळता उत्तम निर्मिती या संकल्पनेवर केली गेली होती.

'पॅरानॉर्मल ऍक्टीव्हिटी'शी आणि 'द ब्लेअर विच प्रोजेक्ट' या सिनेमांशी जवळीक सांगणारा आणि त्या "विदेशी" संकल्पनांना भारतीय रुपडं देणारा बालाजी टेलिफिल्म्सचा नवा "रागिनी एमएमएस" सिनेमाही मूळ सिनेंमाइतकाच प्रभावी बनला आहे.   'लव सेक्स और धोका' प्रमाणेच नावात बिचकवणारा आणि पोस्टर्सवरून काहीसा "हॉट" वाटणारा सिनेमा प्रत्यक्षात लक्षणीय थरारक भूतपट आहे.

उदय आणि रागिणी विकांत 'साजरा' करायला एका बंगल्यात जातात जो एका निर्जन वनात असतो.  उदय सिनेमात हिरो बनण्यासाठी 'पंडीत' नावाच्या माणसासाठी रागिनीचा एमएमएस बनवण्यास तयार होतो.  पंडीताच्या माणसांनी त्या बंगल्यात आधीच क्लोज सर्कीट कॅमेरे लावलेले असतात, आणि उदयही त्याच्या हॅंडहेल्ड कॅमेराने नेहमी शूट करत असतो.  मात्र त्यांना एकांत नीटसा मिळत नाही, आधी रागिनीची मैत्रीण  आणि पार्टी आणि खूद्द काही विचित्र भितीदायक प्रकार घडत जातात.  पॅरानॉर्मल प्रमाणेच आधी भितीची तिव्रता कमी आणि मग वाढत जाते.  'द ब्लेअर विच प्रोजेक्ट' मधील चेटकीणीची कथा पॅरानॉर्मल ऍक्टीव्हिटी तर्‍हेने आपल्या समोर देशी अवतारात दिसते.

सिनेमा मात्र उत्तम थरारपट आहे, जवळपास प्रत्येक क्षणी आणि मोक्याच्या जागी भिती वाटते, आणि हेच सिनेमाचं यश आहे.   दिग्दर्शकाने सिनेमाची लांबी कमी ठेऊन आणि पटकथेवर भरपूर काम करून चित्रपट कुठेच सैल होणार नाही याची उत्तम काळजी घेतली आहे.  सर्वात महत्वाचं म्हणजे उदय आणि रागिनी साकारणारे कलाकार, नवोदित असूनही त्यांनी उत्तम काम केलं आहे.   इंटिमेट सिन्स इतके खरोखर रंगवलेत की सगळं खरं वाटायला लागतं आणि त्यांच्या भितीमध्ये आपण संलग्न होतो.   वेगळा मार्ग चोखाळण्याबद्दल एकता कपूरचं स्वागत करायला हरकत नाही.

Sunday, 22 May 2011

ब्रुबेकर (१९८०)

दिग्दर्शक - स्टुअर्ट रोझनबर्ग
वेकफिल्ड तुरुंगात काही नव्या कैद्यांची भर पडते,  त्यात ब्रुबेकर हा ही एक कैदी असतो.  तुरुंगात आल्याआल्या केसं नीट कापण्यासाठी किंबहूना इजा न होता केसं कापण्यासाठी तिथल्या न्हाव्याला पैसे चारावे लागतात.  जेवणात सॅंडविच वगैरेसाठीही पैसे चारावे लागतात,  कधीकधी अधिकार्‍यांच्या लैंगिक शोषणालाही बळी पडावं लागतं.  मार खाणं आणि प्राथमिक असलेल्या वैद्यकीय सेवेसाठीही डॉक्टरलाही पैसे चारावे लागतात, थोडक्यात तुरुंगात अधिकारी आणि काही कैद्यांनी संपुर्ण अराजक माजवलेलं असतं.
सगळं पाहून एके दिवशी ब्रुबेकर जाहिर करतो की तो कैदी नसून नविन तुरुंगाधिकारी आहे आणि तुरुंगाची अवस्थेचा अभ्यास करण्यासाठी सामान्य कैदी म्हणून तिथं आला होता.  त्यानंतर तो सुत्रं हाती घेतो आणि तुरुंगाचा कायापालट करायचं ठरवतो.

तुरुंगातल्या काही वरिष्ठ कैद्यांना सोबत घेऊन तो चांगल्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करतो.   पण ह्यामुळे वर्षानुवर्ष भ्रष्टाचाराने बटबटलेल्या तुरुंगातील अधिकार्‍यांची धाबे दणाणते.  एकदा छत कोसळल्यामुळे कैदी जखमी होतात तर त्यावेळीही डॉक्टर जखमी कैद्यांकडून पैसे उकळायला पाहतो, ब्रुबेकरच्या कानावर हे पडताच तो डॉक्टरला हाकलवून लावतो आणि नव्या डॉक्टरला बोलावतो, त्यातच त्याला हे कळतं की छताचा विमा नाही आहे, आणि ज्या गोष्टींचा विमा आहे त्या गोष्टी मुळातच नाहीत.

तुटलेलं छत दुरुस्त करण्यासाठी एक कॉन्ट्रॅक्टर स्वतःहून येतो आणि पैश्यांचं आमिष दाखवतो,  तेंव्हा त्यालाही ब्रुबेकर दरवाजा दाखवतो.
पण हे सर्व तुरुंगातल्या अधिकार्‍यांना आणि तुरुंग समितीला आवडत नाहीत, त्यात तुरुंगात टॉर्चर आणि खूनही होतात हे ब्रुबेकरला कळतं आणि तो पुराव्यासाठी मृतदेह पुरलेल्या जागी खोदकाम करायचं ठरवतो, ह्या निर्णयामुळे धाबे दणाणलेलें लोकं समिती, गव्हर्नरवर दबाव आणून ब्रुबेकरला कामावरून कमी करतात. त्यातही कैद्यांचा मात्र त्याला संपुर्ण पाठींबा लाभतो, अश्रुपुर्ण डोळ्यांनी तो तुरुंग सोडतो.   चित्रपटाच्या शेवटी दाखवलंय की त्यानंतर दोन वर्षांनी चोवीस कैद्यांच्या एका कोर्टातल्या केस मुळे तुरुंगाची छळातून मुक्तता होते, आणि ब्रुबेकरचं कार्य सफल होतं.

हा सिनेमा सत्य घटनेवर आधारीत आहे, "थॉमस मर्टन" या अधिकार्‍याच्या स्वतःच्या पुस्तकावर ("Accomplises to the Crime: The Arkansas Prison Scandal") सिनेमाची गोष्ट लिहिली आहे.  रॉबर्ट रेडफर्डचा अभिनय आणि स्टुअर्ट रोझनबर्गच्या दिग्दर्शनासाठी नक्कीच पहायला हवा.

Sunday, 1 May 2011

द नेक्स्ट थ्री डेज (२०१०)

दिग्दर्शक - पॉल हॅगिस
स्वभावाने अतिशय शांत, आणि अगदी साधी दिसणारी माणसं प्रतिकूल परिस्थितीत असामान्य आणि अनपेक्षीत कामं करून जातात.
स्वभावाने अतिशय शांत आणि कुटूंब वत्सल जॉनचं (रसेल क्रो) आयुष्य एका घटनेने अचानक बदलते.  त्याच्या बायकोला, लाराला (एलिझाबेथ बॅंक्स) तिच्या महिला बॉसच्या खुनाबद्दल दोषी ठरवून तुरूंगात टाकलं जातं, त्याच्या आधी तिचं बॉससोबत भांडण झालेलं असतं आणि तिच्या कपड्यांवर रक्ताचे डागही असतात.  एकही पुरावा तिच्या बाजुने नसल्याने तिची सुटका अशक्य असते.
त्याचा  मुलगाही हे स्विकारू शकत नाही, तो त्याच्या आईला भेटी दरम्यान बोलत नाही,  आपला मुलगा आईपासून दुरावतो आहे आणि पत्नी तुरुंगात त्रास भोगतेय हे जॉनला छळत असतं.  एकदा कॉलेजमध्ये शिकवताना जॉन मुलांना विचारतो 'निराशावादी जगण्यापेक्षा, स्वतःला खरं वाटणार्‍या जगात राहणं, अमानवीय आहे का?' ("If we choose to exist in our own reality, are we insane? And if we are, isn't that better than a life of despair?"). त्यातच बरेच प्रयत्न करूनही आणि मित्र असलेल्या त्याच्या वकीलाने जेंव्हा आशा सोडून देण्याचा सल्ला दिल्यानंतर, आपली पत्नी १००% निर्दोष आहे ह्या वर अत्यंत विश्वास असणारा जॉन तिला तुरुंगातून सोडवण्याचा कट करण्याच्या मागं लागतो.  त्यासाठी आधी तब्बल सातवेळा तुरूंगातून पळालेल्या डेमनची (लियाम निसॉन) मदत घेतो.  अतिशय मेहनत आणि अभ्यास करून तो लाराला पळवण्याचा अतिमहत्वकांक्षी प्लॅन तयार करतो. 
जालावरून साभार
फ्रेंच सिनेमा पॉर एल्ले (तिच्यासाठी काहीही  Anything for her) चा इंग्रजी रिमेक असलेला रसेल क्रो अभिनीत 'द लास्ट थ्री डेज' हा चांगला थ्रीलर सिनेमा आहे.  सुरूवात जरी संथ असली तरी सुटकेच्या प्लॅन पासून ते शेवटापर्यंत सिनेमा मस्त पकड घेतो.  रसेल क्रो अपेक्षेप्रमाणेच अप्रतिम अभिनय करतो, जॉनच्या व्यक्तीरेखेत प्राण ओतलाय त्याने.. बायकोवरचा गाढ विश्वास, नेहमी डोळ्यात, चेहर्‍यावर दिसणारा दृढ संकल्प, मुलासाठी होणारी ओढाताण त्याने अप्रतिम दाखवली आहे.  सिनेमा थोडा मोठा वाटतो, बाकी नक्की पाहण्यासारखा.

Sunday, 30 January 2011

127 अवर्स (२०११)

दिग्दर्शक - डॅनी बॉयल

१२७ अवर्स चित्रपटाबद्दल बरंच ऐकलेलं होतं, त्याच्या ऑस्कर शर्यतीतल्या प्रवेशामुळे, रेहमानच्या संगीताच्या ग्लोबल रिकग्निशनमुळे, डॅनी बॉयल दिग्दर्शित असल्यामुळे आणि मुख्य म्हणजे सत्यघटनेवर आधारीत असल्यामुळे सिनेमा पाहायचा हे निश्चितच होतं. त्यात रोहनने त्यावर शिक्कामोर्तब केलं.


ऍरॉन रालस्टन या गिर्यारोहकाच्या आयुष्यातल्या अत्यंत कठीण, जीवघेण्या पण धाडसी १२७ तासांची ही कहाणी सांगतो.  ऍरॉन रालस्टनचं बेस्टसेलर पुस्तक 'बिटवीन अ रॉक ऍण्ड अ हार्ड प्लेस' ह्यात ही संपुर्ण धाडसकथा लिहिली आहे.

ऍरॉन हा गिर्यारोहक, आपला जवळपास प्रत्येक विकांत हा गिर्यारोहण आणि भटकंतीत घालवत असतो, त्याचा फिरण्यासाठी लाडका भाग म्हणजे 'ब्ल्यु जॉन कॅनियन'.  असंख्य वेळा तिथे गेल्यामुळे त्या भागाची सविस्तर माहिती असलेला.  एका विकांताला असाच तो तिकडे निघतो, वाटेत दोन रस्ता चूकलेल्या मुलींना अत्यंत सुंदर अशी जागा जिथे दगडातून एकदम पाण्याच्या साठ्यात उडी घेता येतं दाखवतो, त्यांना सोडून परत आपल्या कॅनियनच्या हायकिंगवर निघतो.  त्या कॅनियनच्या चिंचोळ्या दर्‍यातून जाताना त्याला अपघात होतो, आणि एक भला मोठा दगड त्याच्या उजव्या हाताला घेऊन दरीत अडकून बसतो.  सुरुवातीला ऍरॉनला त्या प्रसंगाचं गांभिर्य लक्षात येत नाही, आपल्याकडील वस्तू वापरून तो यातनं सुटेल असे प्रयत्न करतो पण हळूहळू त्याच्या लक्षात येतं की त्याच्याजवळ जास्त पर्याय नाहीत.  ऍरॉनच्या अतिआत्मविश्वासामुळे तो मोहिमेवर निघताना मोबाईल फोन घेत नाही, आईचा फोन घेत नाही का तर तिने जाऊ दिलं नसतं, घाईत चांगला चाकू (स्वीस नाईफ सेट) घेत नाही.  कुणालाही कुठे जाणार हे सांगत नाही, त्यामुळे त्याची सुटका अजुनच अवघड बनते.  त्यात पाणी आणि अन्नही अपुरं असतं. त्यातून तो कशी सुटका करतो हा सिनेमाचा पुढचा प्रवास.
जालावरून साभार

सिनेमाचा  सुरुवातीचा भाग अतिशय प्रेक्षणीय आहे, कॅनियनला अतिशय सुंदररित्या चित्रीत केलं आहे, आणि दगडांच्या चिंचोळ्या दरीतून पाण्यात उडी घेण्याचा थरारक प्रसंग अतिशय पाहणेबल आहे. त्यानंतर मात्र ऍरऑन अडकल्यावर केवळ घळीत संपुर्ण सिनेमा आहे आणि पठकथेवर डॅनी बॉयलने सुंदर  सिनेमा घडवला आहे. घरुन घाईत निघताना पाणी भरताना तो ते सांडू देतो, नंतर नळ नीट बंद करत नाही, तोच ऍरॉन  नंतर मात्र पाण्यासाठी कसा तडफडतो, शेवटी सुटका झाल्यावर अगदी घाण पाणी सुद्धा पितो. आधी वैतागलेला ऍरॉन नंतर मात्र सुटकेचे एक एक प्रयत्न करतो, प्रयत्न असफल ठरू लागल्यावर आपल्या आयुष्यातला चूका, स्वकियांबद्दलच्या त्याच्या आठवणी, आईचा फोन न उचलल्याबद्दल वाईट वाटणं, एकटं बर्‍याच वेळ राहील्यावर अगदी उडणार्‍या पक्ष्याला बोलावसं वाटणं असे अनेक प्रसंग आपल्याला हेलावून सोडतात.

सिनेमाचं खरं यश म्हणजे ऍरॉन बरोबर आपण त्या सिच्युएशनमध्ये मिसळून जातो, अगदी अडकल्यावर त्याची घुसमट स्वतः अनुभवतो.  प्रमुख भुमिकेत जेम्स फ्रॅन्कोने अतिशय उत्तम काम केलं आहे.  नक्की पहावा.

Saturday, 29 January 2011

दिल तो बच्चा है जी (२०११)

दिग्दर्शक - मधुर भांडारकर

वास्तववादी आणि सिरियस सिनेमा बनविणारा दिग्दर्शक ही प्रतिमा पुसण्यासाठी बहुदा मधुरने ट्रॅक बदलण्याचा प्रयत्न 'दिल तो बच्चा है जी' सिनेमाद्वारे केला, बॉलीवूडपटांचा लाडका विषय 'प्रेम' घेऊन पण थोडासा वेगळा.. थोडा वास्तवदर्शी.  तरीही हा सिनेमा बिनसलेलाच आहे.

एक घटस्फोटीत चाळीशीचा आसपासचा (अजय देवगण), एक भोळा सरळमार्गी प्रेमावर गाढ विश्वास असणारा (ओमी वैद्य), तिसरा फ्लर्ट चालू टाईप (इम्रान हाशमी) , असे तीन वेगवेगळ्या लोकांच्या प्रेमाची ही कहाणी.  अजय देवगणचं त्याच्याच ऑफिसमधील नव्या इंटर्नवर प्रेम बसतं, ती त्याच्यापेक्षा वयाने तब्बल १७ वर्षाने लहान असते, ओमी वैद्यसारखा सरळमार्गी गृहीणी टाईप मुलगी स्वप्ननार्‍याला मुलगी आवडते ती RJ असते आणि अभिनेत्री व्हायचं स्वप्न बाळगून असते, तिच्या ठायी करीयर जास्त महत्वाचं.  प्लेबॉय इम्रान जिच्या प्रेमात पडतो तिच्या सावत्र आईसोबत त्याचं अफेअर असतं. अश्या अडचणी असणार्‍या प्रेमकथांचा पुढचा प्रवास म्हणजे हा सिनेमा.

सिनेमाचा पिंड हलका फुलका ठेवायचा प्रयत्न आहे, पण विनोदी जागा अतिशय कमी आहेत, खळखळून हसण्याचे तर अतिशय कमी प्रसंग आहेत, बर्‍याच विनोदांना प्रेक्षक हसतही नाहीत.  आणि सर्व विनोद हे अश्लील आहेत (सिनेमाला A सर्टीफिकेट आहे).  थोडक्यात मधुरसाठी विनोदी सिनेमा हे प्रकरण बसलं नाही.

सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकाही नायिकेने अभिनयाचा प्रयत्नही केला नाही (अपवाद टिस्का चोप्रा) असं जाणवतं.  अजय देवगण काही सिन्स मध्ये उत्तम तर बाकी अवघडलेला वाटला.  ओमी वैद्य अजुनही थ्री इडिट्सच्या चतूर रामलिंगमच्या बाहेर आला नाही, त्यानं अजिबात व्हरायटी केली नाहीये, त्याला मराठी तेही पुण्याचं दाखवलंय आणि तो स्वतःच आडनाव 'केळकर' ऐवजी 'केलकर' असं हिंदी स्टाईल मध्ये म्हणतो, बाकी नॉन महाराष्ट्रीयन कॅरेक्टर्स असं म्हणतात ते समजू शकतं... तसंही अधुन मधुन त्याचं मराठीही तसं काही मराठीपण दर्शवत नाही.  इम्रान हाश्मीसाठी ही टेलरमेड भुमिका आहे, त्याला जास्त काही वेगळं करावं लागलं नाही, पण तिघातही सर्वात भाव तोच खाऊन जातो, आणि इमोशनल चेहराही त्याने बर्‍यापैकी दाखवला आहे.  'जन्नत' पासून त्याच्या दगडी चेहर्‍यात बरेच चांगले बदल झाले आहेत. :)

मधुर भांडारकर थोड्या सिन्समधुन चमक दाखवतो पण बाकी सिनेमा अतिशय सपाट वाटतो, तिनही पात्रांचे एकसारखे प्रसंग (उदा. प्रेम सफल होण्यासारखं वाटणे, नंतर तो भ्रम ठरणे) हे एकामागोमाग आहेत त्यामुळे पहिल्या पात्राचं जे काही झालं तेच दुसर्‍यांच होणार हे निश्चित असल्यामुळे बराच इंट्रेस्ट कमी होतो, हे दिग्दर्शकाचं अपयश झालंय.  थोडक्यात निराशाजनक अनुभव.

Wednesday, 29 September 2010

१० थिंग्स आय हेट अबाउट यू (१९९९)

दिग्दर्शकः गिल जंगर

बर्‍यापैकी टिपीकल टीन सिनेमा असूनही दिग्दर्शन, अभिनय, पटकथा या पातळींवर चांगला असल्यामुळे गिल जंगर दिग्दर्शित '१० थिंग्स आय हेट अबाउट यू' पहाणेबल झाला आहे.  मी हा सिनेमा पाहीला कारण यात हिथ लेजर आहे. शेक्स्पीअरच्या 'The Taming of the Shrew' या नाटकावर आधारीत.


कॅमेरॉन (जोसेफ गॉर्डन लेविट) कॉलेजात नव्यानं दाखल होतो, आणि बिआंका या सुंदर मुलीच्या लव्ह ऍट फर्स्ट साईट प्रथेप्रमाणे प्रेमात पडतो.  पण बिआंकाचे डॉक्टर वडील पदवीआधी प्रेम किंवा डेटिंगच्या विरोधात असतात.  बिआंकाची बहीण कॅट (ज्युलीया स्टाईल्स) देखिल प्रेमाच्या किंबहुना मुलांच्या विरोधात असते.  बिआंकाला हे सर्व पटत नसते, पण वडिलांसमोर आणि कॅट समोर तिचं चालत नाही.  त्यात ती खुप आग्रह करते पण तिचे वडील एक अट टाकतात, जर कॅट डेटवर जात असेल तर बिआंकाला जाता येईल.

आता कॅटसारख्या रागीट स्वभावाच्या मुलीसाठी मुलगा शोधणं कॅमेरॉनला भाग पडतं.  मग तो पॅट (हिथ लेजर) या कॅटसारख्याच स्वभावाच्या मुलाला तयार करतो, त्यासाठी जो या बिआंकावर लाईन मारणार्‍याकरवी.  हो नाही करता पॅट आणि कॅट दोघही प्रेमात पडतात तसेच आधी जो कडे आकर्षीत असणारी बिआंका कॅट कडून जो विषयी कटू अनुभव ऐकल्यावर कॅमेरॉनच्या प्रेमात पडते.  मग डेट करण्यासाठी घेतलेल्या पैश्यावरून कॅट आणि पॅट च्या संबंधात मीठाचा खडा पडतो, पण पॅट खरोखर प्रेम करू लागला आहे हे कळल्यावर परत शिरस्त्याप्रमाणे एकत्र येतात.


एकुण  पुढे काय घडणार हे माहित असूनही सिनेमा बघावासा वाटतो यात  ज्युलिया स्टाईल्स आणि हीथ लेजरचा महत्वाचा हात आहे.  टीन सिनेमा असल्यामुळे बर्‍यापैकी प्रेडीक्टेबल आहे.  एकदा बघायला हरकत नाही.

Sunday, 5 September 2010

रनिंग स्केअर्ड (२००६)

http://www.imdb.com/title/tt0404390/

दिग्दर्शक - वेन क्रेमर

थ्रीलर्स आपल्याला आवडण्यासाठी ते शेवटापर्यंत आपल्याला खिळवून ठेवणारे असावेत, वेळोवेळी अनपेक्षीत वळणं आणि उत्तम धक्के असावेत, आणि शेवटी सगळ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळावी.  या थ्रीलर्सच्या सर्वसाधारण अपेक्षेमध्ये बरेच थ्रीलर शेवटाला मात खातात.  आधी कथानकात उत्तम गुंतागुंत तयार करतात, पटकथा शेवटापर्यंत अतिशय सुंदर पळते मग शेवटी दिग्दर्शक, पटकथाकार जेंव्हा गुंता सोडवायला घेतात त्यावेळी जास्त वेळ न घेता सोपे पण न पटणारे उपाय सहसा शोधले जातात.   'रनिंग स्केअर्ड' हा थ्रीलर सुद्धा इथेच अडकतो.  अतिशय उत्तम गतीत बराचवेळ राहतो आणि शेवटाला ढिसाळतो.

येथील नायक जो (अत्यंत उत्तम अदाकारीत पॉल वॉकर) एका गुन्हेगारांच्या टोळीत काम करत असतो, ड्रग डिलींगच्या वेळी तिथं काही बुरखाधारी येतात, त्यांना दुसरी टोळी समजून, दोन्ही गटात गोळीबार होतो आणि एक सोडून सर्व बुरखाधारी मरण पावतात,  जो आणि टोळीला लक्षात येतं की ती दुसरी टोळीची माणसं नसून ती भ्रष्ट पोलीस होती, या प्रसंगाने बावरलेला टोळी प्रमुख त्यात वापरलेल्या बंदूकींना नष्ट करण्यासाठी जो कडे देतो.

त्या शस्त्रांची विल्हेवाट लावण्याऐवजी जो ती शस्त्र आपल्या घराच्या बेसमेंटमधील एका खणीत ठेवतो, तसं करताना त्याचा मुलगा निक आणि त्याचा शेजारचा रशियन मित्र ओलेग पाहतात.  तिथुन ओलेग घरी परत जातो, त्याचे विक्षीप्त वडील त्याला त्रास देतात त्यातच ओलेग त्यांच्यावर गोळी झाडतो, ती चुकते व खांद्याला लागते, गोळीबाराचा आवाज ऐकून जो त्यांच्या घरी येतो व केलेल्या वर्णनावरून त्याला लक्षात येतं की ही बंदूक त्याचीच आहे आणि ती जर पोलिसांच्या हाती लागली तर तो आणि त्याची टोळी अडचणीत येणार.

मग जो चा ओलेग आणि पर्यायाने त्या बंदूकीचा शोध, त्यात ओलेग वेगवेगळ्या अडचणींमध्ये सापडतो आणि दरवेळी त्याचा पाठलाग करताना जो आणि त्याची बायको टेरेसा (व्हेरा फर्मिंगा) त्याची सुटका करता करता अनेक अडचणीत सापडतात.  या अडचणीतून ओलेग, जो आणि टेरेसा कसा मार्ग काढतात ही पुढील कथा.

सुरुवातीपासून ते शेवटच्या वीस मिनिंटापुर्वी पर्यंत सिनेमा आपल्याला अगदी सिटच्या एजवर ठेवतो, अतिशय उत्कंठावर्धक सिक्वेंसेस आहेत,  दरवेळी ओलेग नविन अडचणीत येतो आणि बंदूक बर्‍याच लोकांच्या हातातून जाते, त्यासर्वांना शोधताना जो ची कसोटी लागते.  पुर्णवेळ फॉर्मात असणारा हा सिनेमा शेवटाला मात्र गुंते सोडवताना मात्र पार कोलमडतो.

पॉल वॉकर (जो), व्हेरा फर्मिंगा (टेरेसा), कॅमेरॉन ब्राईट(ओलेग) आणि कारेल रॉडेन (ओलेगचे सावत्र वडील) यांचा अभिनय उत्तम आहे.  लेखक आणि दिग्दर्शक वेन क्रेमरचं दिग्दर्शन उत्तम आहे, केवळ शेवटाचा काही भाग वगळता, यात दिग्दर्शकापेक्षा लेखक कमी पडला आहे.  सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे, एका घरातून दुसर्‍या घरात काचातून कॅमेरा आत नेण्याची पद्धत छान वाटली आहे.

शेवटचा काही भाग वगळता अतिशय उत्तम थरारपट.

Wednesday, 4 August 2010

क्रॅमर वर्सेस क्रॅमर (१९७९)

दिग्दर्शक - रॉबर्ट बेन्टन

तो आज प्रचंड खुष असतो, तो काम करत असलेल्या ऍड कंपनीत सर्वोच्च महत्वाच्या क्लायंटचं काम सोपवण्यात येतं, कारण त्याची काम करण्याची क्षमता आणि झोकून देण्याची वृत्ती.  या क्लायंटला जर खुष केलं तर त्याच्या कंपनीचा फायदा होणार असतो.  त्या खुषीतच तो घरी येतो, ऑफिसमध्ये एक अर्जंट कॉल करत असतानाच ती त्याला एक धक्कादायक बातमी देते.  ती त्याला आणि त्यांच्या लहान मुलाला सोडून जाणार असते, कारण त्याचं स्वत:पुरतं वागणं, तिच्या अस्तित्वाची दखल न घेणं, घरासाठी वेळ न देणं.  ती बाहेर पडते ते स्वत:ची ओळख मिळविण्यासाठी.  तो एकदम धक्क्यात, आठ वर्षाचा संसार मोडून निघालेली बायको, आजच ऑफिसात वाढलेली जवाबदारी, शाळेत जाणारं मुल, आणि त्याच्या संगोपणाचा पडलेला भार.

इतके दिवस बायको असल्यामुळे घर आणि मुल सांभाळण्याची कधीही गरज न पडलेला पण आता तिहेरी कसरत करावी लागणार म्हणुन काळजीत.  आठ वर्षात कधीही बाहेर पडली नाही म्हणुन ती परत लवकर येईल अशी त्याची आशा हळूहळू मावळत जाते. या सर्वात फरफट होते त्यांच्या मुलाची. आई घेत असलेली काळजी, ती देत असलेला वेळ, तिचा समजुतदारपणा, प्रेम हे त्याला मिळेनासं होतं.  त्याला आपल्या कामातून कमी वेळ मिळतो, घरकाम येत नाही, मग ब्रेकफास्ट बनवताना होणारी तारांबळ, मुलाचा हट्टीपणा, जेवण्याचे प्रॉब्लेम्स त्यातुन मुलाबरोबर होणारं भांडण अश्या समस्यात दोघे अडकतात.

पण हळूहळू काही महिन्यांत ते परिस्थितीला सामोरे जाऊन एकमेकात ऍडजस्ट व्हायला लागतात, जिव्हाळा वाढायला लागतो.  मुलाला खेळता खेळता इजा पोचते तेंव्हा अक्षरश: रस्त्याने पळत त्याला हातात घेऊन तो हॉस्पीटल गाठतो, दोघांचे बंध वाढायला लागतात.

ती काही महिन्यांच्या प्रयत्नानंतर एका जॉबला लागली आहे, रोज मुलाच्या शाळेजवळ येऊन त्याला न भेटताच केवळ त्याच्याकडे बघत आहे, त्याला भेटायची तिला अनिवार इच्छा आहे. स्वत:च्या पायावर उभी राहील्यामुळे आणि आत्मविश्वास उंचावल्यामुळे तीच्या मनात आता मुलाला स्वत:कडे ठेऊन घेण्याचे येत आहे.  मग ती तिच्या वकीलामार्फत त्याला लीगल नोटीस पाठवते.

मुलाच्या संगोपणामुळे ऑफिसची नवी जवाबदारी समर्थपणे न पेलू शकल्यामुळे त्याला ऑफिसमधुन काढण्यात येतं, त्यातच तीच्या नोटीस मुळे मुल जर त्याला आपल्याजवर ठेऊन घ्यायचं असेल तर अत्यंत पैश्यांची गरज असते,  मग चोविस तासात त्याच्या अनुभवापेक्षा कमी मानधन आणि खालची पोजीशन असलेली नौकरी तो स्विकारतो आणि खटला लढतो.

पुढे काय होतं ते चित्रपटात पाहणंच योग्य.

क्रॅमर वर्सेस क्रॅमर चं प्रमुख यश म्हणजे नायक डस्टीन हॉफमन आणि नायिका मेरिल स्ट्रीप, जबरदस्त पटकथा आणि काही अप्रतिम सिन्स.  ती गेल्यावर त्याची ब्रेकफास्ट बनविताना होणारी कसरत, शेवटी ब्रेकफास्ट सीन, मुल घसरगुडीवरून पडल्यावर त्याचं त्याला हातात घेऊन हॉस्पीटल गाठणं, भांडण झाल्यावर दुसर्‍या सकाळी मुलाची माफी आणि आई आपल्यामुळे सोडून गेली याची भावना, मुलाला सायकल शिकवणं, कोर्टातले सिन, आणि शेवटाचा लिफ्ट मधील सिन......


डस्टीन हॉफमनने आधीचा वर्कोहॉलीक माणुस आणि नंतरचा हळवा बाप अविस्मरणीय साकारला आहे, मेरिल स्ट्रीपची हळवी पण स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव असणारी पण मुलासाठी जीव तुटणारी आई समर्थपणे साकारली आहे, ती दिसतेही अतिशय सुंदर, त्यांना योग्य साथ आहे मुलाची आणि त्यांच्या मैत्रिणीची.

पाहणं एकदम मस्ट!

(आपल्याकडे याचा ऍव्हरेज अवतार येऊन गेला आहे 'अकेले हम अकेले तुम')

Monday, 14 June 2010

द स्पॅनिश प्रिजनर (१९९७)

दिग्दर्शक - डेव्हिड मॅमेट

IMDB : http://www.imdb.com/title/tt0120176/

can you really trust anyone?
दिसतं तसं नसतं हेच खरं, कुणावर किती भरवसा ठेवायचा, हे ठरविणे खुप कठीण काम आहे.
'स्पॅनिश प्रिजनर'या नावावरून दुसर्‍या देशाच्या कायद्यात फसलेल्या नायकाची कथा असावी वाटते. प्रत्यक्षात हा लक्षवेधी थरारपट 'स्पॅनिश प्रिजनर' या फसवणुकीच्या प्रकाराचा वापर करतो.

'स्पॅनिश प्रिजनर' म्हणजे स्पेन मध्ये एक श्रीमंत माणसाला फसवून तुरूंगात डांबल्या गेला असल्याची अफवा एका सावजाला सांगायची. तो तिथुन सुटण्याचा प्रयत्न करत आहे, आणि त्यासाठी त्याला काही पैसे मोजावे लागणार आहेत, तर तात्पुरती जो मदत करेल त्याला श्रीमंत माणुस सुटल्यावर जबरदस्त बक्षीस देण्याचे लालूच.
इथे जास्त माहीती आहे.  यात सावजाला संशय येऊ नये म्हणुन ही बातमी सांगणार्‍याला अत्यंत काळजीपुर्वक सावजाचा विश्वास संपादन करायचा असतो.


या सिनेमात सावज, जो रॉस ह्याने एक अशी प्रक्रिया तयार केली असती ज्यामुळे कंपन्यांचा करोडोंचा फायदा होणार असतो, अत्यंत मेहनतीने तयार केलेल्या या प्रक्रियेमुळे आणि त्याचा महत्वामुळे ती अतिशय सुरक्षीत जागी ठेवलेली असते. जो मात्र त्याच्या मानधनाबाबत संतुष्ट नसतो. वारंवार विचारूनही कंपनीचे मालक त्याला मानधनाविषयी जास्त काही सांगत नाही,केवळ योग्य वेळी योग्य मिळेल यावर बोळवण करीत असतात.

एका व्यावसायिक सहलीवर जो'ची ओळख अतिशय श्रीमंत उद्योगपती जिमी डेल बरोबर होते, जिमी सोबत ओळ्ख वाढवताना जिमी त्याला त्याच्या प्रक्रियेबद्दल कंपनी जास्त पैसे देणार नाही, आणि त्याने ओळखीच्या वकीलाचा सल्ला घ्यावा असे सांगतो, प्रक्रियेची मुळ प्रत सुद्धा सोबत आणायला सांगतो. दरम्यान कंपनीत नव्याने रुजू झालेली एक मुलगी सुसानशी जो'ची जवळीक वाढायला लागलेली असते, ती मात्र जिमीच्या वागण्यावर शंका घेत असते.

त्यातच जो'ला जिमी हा फसविणारा आहे असे कळते आणि तो एफबीआय एजंटला बोलतो, आणि ते जिमीला पकडण्यासाठी सापळा रचतात, पण जो ज्यांना बोलावतो आणि विश्वासाने प्रत त्यांकडे देतो ते एफबीआयचे एजंट नसून फसवेच असतात. त्यातच त्याला सहकार्‍याच्या खुनाच्या आरोपात अत्यंत शिफातीने गोवण्यात येते. तिथुन तो पळुन जातो व सुसानची मदत घेऊन जिमीचं रहस्य उघडायला आणि स्वतःला निष्पाप सिद्ध करायला जातो, त्यात तो यशस्वी होतो का, हा सिनेमाचा पुढचा भाग.

सिनेमा अतिशय उत्कंटावर्धक आहे, सुरुवातीच्या सत्रात थोडा संथ आहे, पण पहील्या २० मिनिटांनंतर मस्त वेग पकडतो. पटकथा अतिशय घट्ट विणली आहे आणि कुठेही सैल होत नाही. अगदी शेवटच्या मिनिटांपर्यंत पटकथेत वळणं, धक्के आहेत. कुठेही सिनेमा प्रेडिक्टेबल होत नाही. अभिनयात सर्वांनी कमाल केली आहे, नेहमी विनोदी भुमिकेत असणार्‍या स्टीव मार्टीनने सुद्धा गंभीर अभिनय चांगल्या रितीने केलाय.

चांगला थरारपट पाहण्याची इच्छा असेल तर पहावाच असा.

Sunday, 13 June 2010

500 डेज ऑफ समर (२००९)

दिग्दर्शक - मार्क वेब

IMDB : http://www.imdb.com/title/tt1022603/

बॉलीवूडची सर्वात घासुन गुळगुळीत झालेली कहाणी कोणती? दोन जीवांच प्रेम.. त्यात मुलगा प्रेमावर विश्वास न ठेवणारा..  आणि मुलगी प्रेमावर आंधळा विश्वास ठेवणारी... सरतेशेवटी मुलाचाही प्रेमावर विश्वास बसणार आणि गोष्ट सफळ संपुर्ण होणार.. ह्याच बॉलीवूडी कंसेप्टवर आधारीत असणारा पण वेगळेपण जपणारा '५०० डेज ऑफ समर' हा हॉलीवूडी चित्रपट एक सुंदर रोमॅन्टीक ड्रामा आहे. 

ह्यात नायक टॉम प्रेमावर विश्वास ठेवणारा असतो, तर नायिका समर ही प्रेमावर विश्वास न ठेवणारी असते.  समरला नाती, त्यानंतर येणारी जवाबदारी, होणारी फसवणुक मंजुर नसते.  टॉम हा आर्कीटेक्टचं शिक्षण घेतलेला पण पोटासाठी ग्रीटींग कार्ड बनविणार्‍या कंपनीत काम करणारा असतो.  तिथे त्याची ओळख समर हिच्याशी होते....पहाताक्षणीच त्याचं प्रेम तिच्यावर जडतं.... पण समरचा प्रेमावर, नात्यांवर विश्वास नसतो...

प्रेम आणि नातं यावरुन दोघात वाद होतात तरीही केवळ सोबत असताना चांगले वाटत असल्यामुळे त्यांची जवळीक कायम राहते, पण अशाच एका वादामुळे ते दुरावतात.. टॉमला याची टोचणी राहते.. समर तो जॉब सोडते.

एका जुन्या कलीगच्या लग्नाला जाताना प्रवासात टॉम आणि समर भेटतात.  परत थोडेसे जवळ येतात, तिथेच समर टॉमला घरी पार्टीसाठी बोलावते.  त्या पार्टीत टॉम समरकडे जातो पण तिच्या बोटात एंगेजमेंट अंगठी पाहुन तिथुन निघुन जातो. अतिशय विमन्सक अवस्थेत जॉब सोडतो आणि दारूच्या आहारी जातो.

मग हळूहळू स्वतःला सावरून आपल्या आर्कीटेक्ट विषयाकडे वळतो व त्या क्षेत्रात नौकरी शोधायला लागतो..

इथे कथा सरळ सांगितली असली तरी चित्रपटात ती उलट सुलट दाखविली आहे.  टॉम आणि समरचे हे संबंध ५०० दिवस चालतात (५०० डेज ऑफ समर म्हणुन चित्रपटाचे नाव).  चित्रपटात आधी दिवसाचा नंबर देऊन त्यादिवशीची कथा दाखविली आहे... ही नॉन लिनीअर मांडणी छान वाटते, मुख्य इथे जुळते.

चित्रपटात टॉम आणि समर निभावलेले कलाकार जोसेफ गॉर्डोन आणि झोयी सुंदर भुमिका करतात.  झोयी तर अप्रतिम, समरच्या भुमिकेत अगदी फिट्ट.  दिग्दर्शन सुद्धा चांगलं आहे,  प्रेमात असताना 'होम सेंटर' टाईप मॉलमध्ये फिरताना नविन जोडप्याप्रमाणे तिथेच काल्पनिक संसार मस्त रंगविला आहे.. मजा येते ते पाहताना.  प्रेम जुळल्यावर टॉमवर अगदी टिपिकल बॉलीवूड पटांप्रमाणे एक गाणे चित्रीत केले आहे, रस्त्यावर तो गाणे गातो, रस्त्यावरचे लोकं त्यात सामिल होतात वगैरे... हॉलीवूडच्या हिरोवर हे गाणं वेगळंच वाटतं..
सिनेमा संपतो सुद्धा एका गोड शेवटासहीत, पाहणेबल आहे.

Sunday, 30 May 2010

कार्तिक कॉलींग कार्तिक (२०१०)

दिग्दर्शक - विजय लालवानी.

दिल चाहता है, लक्ष्य, डॉन, हनिमुन ट्रॅवल्स प्रा.लि., रॉक ऑन, आणि लक बाय चान्स असे जवळपास सुंदर सिनेमा देणार्‍या एक्सेल एंटरटेन्मेंटचा या वर्षीचा सिनेमा 'कार्तिक कॉलींग कार्तिक' त्याच्या प्रोमोजवरुन एक चांगला थ्रीलर असल्याची साक्ष देत होता.    कुणाला एक फोन येतो, त्यात बोलणार्‍याचा आवाज अगदी तसाच असतो, त्याला आपली सगळी रहस्ये, गुप्त माहिती माहित असते, थोडक्यात आपल्याला आपणच कॉल करतोय ही सुंदर कल्पना आहे एका थ्रीलरपटाची.

'कार्तिक कॉलींग कार्तिक' मध्ये कार्तिक (फरहान अख्तर) अतिशय साधा, नाकासमोर चालणारा असतो.  चांगुलपणामुळे जास्तीची कामे ओढुन घेणे, काम करूनही बॉसचा ओरडा खाणे, कुणी मित्र नसने, ऑफिसात काडीचीही किंमत नसने, घरमालकाने सतावणे अश्या असंख्य समस्यांनी ग्रस्त असतो. यातच त्याला एक नेहमी स्वप्न पडत असते ज्यात त्याचा त्रास देणारा भाऊ विहिरीत पडुन मरतो. या मृत्यु साठी कार्तिक स्वतःला दोषी समजत असतो. यासाठी तो मानसोपचार तज्ञाची मदत सुद्धा घेत असतो.

एकदा रात्रभर जागुन काम करुन देखील बॉस कार्तिकला फोनवर खुप सुनावतो, आणि त्याला नोकरीवरुन कमी करतो. रागाच्या भरात कार्तिक फोन तोडतो आणि राग शांत झाल्यावर नविन फोन बसवतो.

दुसर्‍या दिवशी सकाळी एका फोन कॉल मुळे त्याची झोपमोड होते, कॉल उचलल्यावर पलीकडुन कार्तिक म्हणजे त्याचा स्वतःचाच कॉल असल्याचे त्याला कळते. पहिल्याप्रथम त्याला हे सर्व खोटं; एक विनोद वाटतो.  पण फोन करणारा अशी काही सिक्रेट्स सांगतो जी केवळ कार्तिकलाच माहित असतात. त्या कॉलरचा आवाज देखील कार्तिक सारखाच असतो.

तो कॉलर कार्तिकला त्याच्या सर्व पेचप्रसंगातुन सोडवितो. त्याला जशास तसे वागायला शिकवितो.   त्याचं प्रेम मिळवुन देतो, पण त्याबरोबर एक अट देखिल ठेवतो, की हा कॉल त्याला येतो हे कुणाला सांगायचं नाही.
कार्तिक प्रेमापुढे झुकुन प्रेयसीला हे सगळं सांगतो आणि मग तो कॉलर कार्तिकलाच संपवायला निघतो.
हा कॉलर कोण? आणि पुढे कार्तिकचे काय होते हा सिनेमाचा उत्तरार्ध.

सिनेमा एक उत्तम थरारपट आहे.  शेवटपर्यंत आपल्याला खिळवुन ठेवतो.  सिनेमाच्या डार्क फ्रेम्स रहस्यात गुढतेची भर टाकतात.  मात्र थरारपटाच्या उत्सुकतेत अनावश्यक गाणी (ऐकायला बरी असुन) आणि थोडं लांबविलेले प्रेमप्रकरण व्यत्यय आणते.  पण सिनेमा तगतो तो फरहान अख्तरच्या अतिशय प्रामाणिक अभिनयावर.  सरळ साधा कार्तिक त्याने उत्तम रंगविला आहे, घाबरणारा कार्तिक आणि नंतर आत्मविश्वासाने वागणारा कार्तिक त्यांने व्यवस्थित रंगविला आहे.

पण त्याचं हे ट्रांस्फोर्मेशन अगदी फिल्मी दाखविले गेले आहे.  उदा.  नोकरीवरुन काढल्यावर तो बॉसच्या केबिन मध्ये जातो, टेबलावरची क्लाईंट फाईलचे पहीले एक-दोन पानं वाचुन त्यात तब्बल १२ चुका आहेत हे काही सेकंदात सांगतो वगैरे.  पण त्याकडे आपले जास्त लक्ष जात नाही.  विजय लालवानींना सिनेमाचे श्रेय द्यायलाच हवे, पहिल्या सिनेमातच त्यांनी आपली छाप पाडली आहे.  दिपिका पडुकोन, राम, बाकी सहकलाकार योग्य.

एकुणात हिन्दी मध्ये काहीतरी वेगळं पाहण्याची इच्छा असेल तर जरुर पाहाण्याजोगा.

Sunday, 23 May 2010

काईट्स (२०१०)

दिग्दर्शक - अनुराग बसू

राकेश रोशनचा सिनेमा, ऋतिक, जोडीला मेक्सिकन हॉटी बार्बरा मोरी आणि जोडीला सुमधुर संगीत या सर्व गोष्टींमुळे अत्युच्य अपेक्षा असलेला काईट्स सिनेमा.
मी स्वत: सिनेमाला जाताना फारशा अपेक्षेने गेलो नाही, कारण राकेश रोशनचे सिनेमे हिंदी सिनेमांच्या टिपिकलनेस मध्येच जास्त रमतात, त्यामुळे वेगळे काही असण्याची अपेक्षा नव्हतीच.
सिनेमाची नायीका मेक्सिकन आहे आणि जाहीराती पाहुन सिनेमा वेगळा असावा असे वाटले, पण असे काहीही नाही, सिनेमा एक नेहमीचीच प्रेमकथा आहे.

कथा म्हणजे जे(हो, हे ऋतिकचे नाव आहे) हा अमेरिकेतल्या लासव्हेगास या शहरात डान्सर असतो, त्याच बरोबर त्याच्या एका मित्राबरोबर अमेरिकेत ज्या मुलींना ग्रिनकार्ड हवे आहे, त्यांच्यासोबत लग्न करुन त्यांना कार्ड मिळवुन देऊन दलाली मिळवणारा असतो.  श्रीमंत होण्यासाठी काहीही करण्यासाठी तयार असणारा जे, प्रसिद्ध कसिनोच्या मालकाच्या मुलीला (कंगना) पटवितो व तिच्यासोबत लग्नाचा घाट घालतो, याच वेळी टोनी ह्या कंगनाच्या भावासोबत नताशा (बार्बरा मोरी) ही सुद्धा जवळीक साधते. पण जे चे नताशावर आधीच प्रेम असते( तिला आगोदर त्याने ग्रीनकार्ड मिळवुन दिलेले असते), मग ’जे’ला प्रेमाचा साक्षात्कार होतो आणि तो टोनीशी वैर पत्करुन नताशाचे प्रेम मिळविण्याकरीता सर्वांशी लढतो, त्यात तो यशस्वी होतो का नाही, हा पुढचा सिनेमा.

ही कथा नविन नक्कीच नाही, बरं कथानकात काही टप्पे, वळणं नाहीत, एकदम सरधोपटपणे कथा समोर सरकते.  मात्र सरधोपट कथानकाला (किंबहुना पटकथेला) थोडाबहुत सावरतो तो सिनेमाचा लूक.
एकदम स्टाईलाइज्ड लूक दिला आहे सिनेमाला.  सरळ कथानक न दाखवता फ्लॅशबॅक अधुन मधुन वापरुन, थोडी उत्सुकता वाढविण्याचा प्रयत्न केला आहे पण कथानक त्यावर सराईतपणे बोळा फिरवितो.  साहसदृष्ये अप्रतिम असली तरी कुठेतरी ते खोटं आहे ही भावना राहतेच.  पावसात गुंडांना स्टेनगनने ऋतिक ज्यापद्धतीने मारतो (तो दुसरा विचार करत आहे, आणि तो सिनेमाचा हिरो आहे हे त्याला माहित असल्यागत १०-१२ मुळ गॅन्गस्टर लोकांचे नेम चुकतात, तो निधड्या छातीने सगळ्यांवर चाल करून जातो आणि त्याला साधं खरचटत देखील नाही) ते नक्कीच पटत नाही.  परत फ्लॅशबॅकमुळे पाठलाग सुरु असताना मध्येच प्रेमकथेमुळे चित्रपट स्लो होतो, त्यात परत गाणी येतात. गाणी जरी बर्‍यापैकी असली आणि त्यांचे चित्रिकरण उत्तम असले तरी तिथे ती जागा चुकल्यासारखी वाटतात.

या कथेकडे पाहता, बार्बरा मोरी ऐवजी एखादी हिन्दी नायिका असली असती तर काहीच फरक पडला नसता, मग विदेशी नायिकेची गरज पटत नाही, असे असले तरी बार्बरा मोरी हिचं काम मात्र सुंदर झाले आहे.  ती दिसते सुद्धा छान, अपवाद काही सिनचा जिथे ती थोडी ओव्हरएजेड वाटते.  ऋतिक आणि तिची जोडी उत्तम वाटली आहे, दोघांना एकत्र पाहणे ही एक ट्रीट आहे.  अपेक्षेप्रमाणेच ऋतिक सिनेमाचा श्वास आहे आणि तो त्याप्रमाणे जबरदस्त अदाकारी दाखवितो.  एक विशेष गोष्ट म्हणजे केवळ हिंदी सिनेमा आहे म्हणुन बार्बराच्या तोंडी टिपिकल (स्पॅनिश) हिन्दी संवाद नाही आहेत, तिला तिच्या स्पॅनिश ऎसेंट मध्ये बोलायला वाव दिला आहे.  खाली इंग्रजी सबटायटल्स आहेत ज्याचा थोडा प्रतिकुल परिणाम होऊ शकतो, पण सिनेमात विदेशी लोकं बोलतात तश्या कंटाळवाण्या हिन्दी पासुन आपण वाचतो.  पण यात देखील एक मेख आहेच, प्रत्येक स्पॅनिश संवादाला सबटायट्ल्स न देता मर्जीप्रमाणे काही संवादांना ते काटले आहेत, त्याचंही कारण आहे, जे संवाद नायकाला नाही समजले ते आपल्याला देखिल समजू नये, पण हा प्रकार वात आणतो, मोरी बोलताना दरवेळेस आपले लक्ष सबटायट्ल्स कडे जात असल्यामुळे आणि क्वचित ते दिले नसल्यामुळे थोडा अपेक्षाभंग होतो.

कंगना आणि कबिर बेदी सारख्या कलाकारांना अक्षरश: वाया घातले आहे.  प्रमुख खलनायक निक ब्रॉउन अक्रस्ताळी भुमिका तितक्याच अक्रस्ताळेपणाने निभावतो.  बाकी सहकलाकारांचा अभिनयसुद्धा जाणविण्या इतपत कच्चा वाटतो.   एकुणात अपेक्षाभंग करणारा अनुभव.

Saturday, 1 May 2010

लव, सेक्स और धोखा (२०१०)

दिग्दर्शक - दिबाकर बॅनर्जी

नावावरुन बिचकुन जाऊ नका. हे सिनेमाचं नाव जरी हिंदी वृत्तवाहीन्याच्या तृतीय दर्जीय कार्यक्रमाचं वाटत असलं तरी हा सिनेमा उथळ विषयावर आधारीत नाही आहे.
’खोसला का घोसला’ आणि ’ओय लक्की लक्की ओय’ सारखे उत्तम चित्रपट बनविणारे दिबाकर बॅनर्जी या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत, यावरुन सिनेमा उथळ नसनार अशी खात्री होती आणि अपेक्षेप्रमाणे चित्रपट खुपंच चांगला निघाला.

साधारण चित्रपट पाहतान आपण कॅमेराच्या जागी असतो, पण कॅमेरा हा सिनेमाचा, त्याच्या कथेचा भाग असतो असे फार क्वचित पाहायला मिळते. हॉलीवूडमध्ये ’क्लोवरफिल्ड’, ’माय लिटील आय’, ’द ब्लेअर विच प्रोजेक्ट’, आणि ’पॅरानॉर्मल अक्टीवीटी’ सारखे प्रयत्न वारंवार झालेले आहेत. माझ्या पाहण्यातला हिंदीतला हा पहीलाच प्रयत्न, आणि अगदी कौतुकास्पद असा.

या चित्रपटात तीन कथा कॅमेराच्या साथीनं आपल्याला दिसतात, पहिली ’लव’ प्रेमाची गोष्ट, एक तरुण दिग्दर्शक ’चोप्रा’ पद्धतीने भारावलेला चित्रपट बनवत असतो, त्याच्या कॅमेराने हा भाग आपल्याला दिसतो. दुसरी कथी , ’सेक्स’, एका छोट्याश्या मॉलमधील क्लोज सर्कीट कॅमेरांतर्फे दिसते आणि तिसरी, ’धोखा’, ही कास्टींग काऊच आणि मिडीयाच्या कॅमेरातुन दिसते.

तीनही कथांमध्ये कुठे ना कुठे इतर कथांचा संदर्भ येतो पण त्याचा कथेवर काहीही परिणाम नाहीये, तीनही स्वतंत्र म्हणाव्या अश्या कथा. सुरुवातीला खेळीमेळीत जाण्यार्‍या, हलक्या फुलक्या प्रसंगाच्या, प्रासंगी विनोद वापरणार्‍या, पण शेवटाकडे अतिशय गंभीर होत जाणार्‍या अश्या मांडल्या आहेत, यामुळे आपल्यावर परिणाम मात्र खुप खोलवर होतो.

एकही पात्र ओळखिच्या चेहर्‍यांनी न केल्या मुळे आणि सर्वांनी अतिशय खरा अभिनय केल्यामुळे हा चित्रपट वाटतच नाही, वास्तवातल्याच काही घटना पाहत असल्यासारखे वाटते हे चित्रपटाचे प्रमुख यश, काही सिन्स तर अगदी अंगावर येतात. पटकथा अतिशय घट्ट आहे, कुठेच ताबा सुटत नाही. स्टिंग ऑपरेशन्स, हॅण्डहेल्ड कॅमेरा असल्यामुळे कॅमेरा सतत हालतो, पडतो, कधी कधी काहीही दिसत नाही, गरगर फिरतो वगैरे पण ह्याच सगळ्या गोष्टी त्याला त्याचा परिणाम गाठुन देतात.

बॉलीवूडसाठी असा प्रामाणिक आणि वेगळा प्रयत्न केल्याबद्दक दिवाकर बॅनर्जींचे अभिनंदन करायलाच हवे. चकचकीत करमणुकची अपेक्षा केली तर निराशा येईल, आणि अर्थातच नावामुळे चित्रपटात ते पहायला मिळेल अशी अपेक्षा एकदमच फोल आहे.

Friday, 23 April 2010

फुंक २ (२०१०)

दिग्दर्शक - मिलिंद गडागकर

परत एक राम गोपाल वर्माच्या कारखान्यातला सिनेमा, त्यात हॉरर थीम, अजुन एक भर म्हणजे सिक्वल.... पहावा का पाहू नये ? तसं पहायला गेलं तर नाविन्याची आशा फार कमी.
पण दिग्दर्शक तर नविन आहे ना? ट्राय करायला काय हरकत आहे? असेच अजुन काही प्रश्न मनात घेऊन आणि दुसरा कुठलाही चित्रपट पर्यायी नसल्यामुळे शेवटी फुंक २ पहायचं आम्ही ठरवलं.

जेव्हडं काही ऐकलं होतं त्यावरुन चित्रपटाकडुन खुप कमी आशा होत्या, आणि या अपेक्षेला चित्रपट जागला. कथा म्हणजे सरधोपट भयपटाची आहे, शहरापासुन दुर अश्या एकट्या बंगल्यात एक कुटुंब राहायला येतं, आणि मग भाग १ मध्ये मारलेल्या भुताने घेतलेला बदला.

स्पॉयलर अलर्ट..
भुत न दिसता दार अश्या पद्धतीने लावुन घेतं की कुणालाच ते उघडता येत नाही, पण सोफ्याआड लपलेले मनुष्य त्याला दिसत नाहीत. दोन मांत्रीकांना त्यांच्या घरात जाऊन मारणार्‍या भुताला एकाच बंगल्यातला लहान मुलांना मारता येत नाही, त्यासाठी २ तास खर्ची घालावे लागतात. भुत बदला घेताना नायकाला म्हणतं की मी तुझ्या आप्तांना तडपवुन मारणार आहे आणि प्रत्यक्षात त्यांचा वॉचमन, कामवाली बाई, दोन मांत्रीक मारण्यासाठी २ तास खर्ची घालतो, आणि बळे बळेच शेवटाला दोघांचे प्राण घेतो, शेवटतर अतर्क्यच, बायकोला मारुन बाकी फॅमिलीला निवांत सोडुन देतो.

अश्या भरमसाठ चुकांमुळे पहिल्या ४०-४५ मिनिटांनंतर सिनेमाची पकड ढिली होते, सुरुवातीला खरोखरीच काही सिनमध्ये भिती वाटते, वातावरण निर्मीतीसाठी सर्वात मदतगार ठरले ते सिनेमाचे पार्श्वसंगीत, बाकी सगळीकडे बोंबाबोंब. कॅमेरावर्क नेहमीप्रमाणे वर्मा स्टाईल, वेगळे काही नाही.

हॉलीवूडमध्ये भयपटांसाठी वेगवेगळे प्रयोग होत असताना (उदा. पॅरानॉर्मल एक्टिवीटी), अलिकडच्या काळात भयपटांची सातत्याने निर्मीती करणारे राम गोपाल वर्मा रामसेपटांच्या वर्तुळाबाहेर येऊ इच्छीत नाहीत, ’भुत’ चित्रपटाचा अपवाद सोडता, बाकी सगळे भयपट एकाच माळेचे मणी वाटतात.

सिनेमा पाहीला असेल तर माझ्या मतांशी सहमत असणारच आणि पाहीला नसेल तर अर्धे पैसे मला दया... :)